साधकांनो, ‘समर्पणभाव’ वाढवून श्रीरामस्वरूप गुरूंच्या अवतारी कार्यात स्वतःला झोकून द्या आणि त्यांचे आज्ञापालन करून स्वतःचा उद्धार करून घ्या !
श्रीरामनवमीनिमित्त श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा शुभसंदेश !
‘३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमी आहे. त्यानिमित्त आदर्श रामराज्याचा संस्थापक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्राच्या दैवी गुणभांडाराचे भक्तीमय अवलोकन करतांना मला रामायण काळातील पुढील प्रसंगाचे स्मरण झाले, ‘रामसेतूचे निर्माणकार्य चालू असतांना प्रभु श्रीरामाने समुद्रतटावर शिवलिंगाची स्थापना केली. ‘रावणवध करून लंकेतून सीतेला सोडवून आणण्यात यश प्राप्त व्हावे’, या उद्देशाने श्रीरामाने शिवशंकराची आराधना केली. श्रीरामाच्या या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर त्याच्या समोर प्रगट झाला. तेव्हा या कार्यपूर्तीसाठी भगवान शिवाला प्रार्थना करतांना भक्तवत्सल प्रभु श्रीरामाने ‘या कार्यात मला साहाय्य करणार्या सर्व वानरांनाही भगवद़्भक्तीचे वरदान प्राप्त व्हावे,’ अशीही प्रार्थना केली.’
श्रीरामाने केलेल्या या प्रार्थनेतून त्याची वानरांवरील अपार प्रीती अनुभवता येते. खरेतर चिरंतन भक्ती ही वरदानाने मिळण्यासारखी नसून अंतःकरणात भक्ती निर्माण होण्यासाठी चित्तशुद्धी होणे आवश्यक असते. ही चित्तशुद्धीही कठोर तपश्चर्या आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यांद्वारेच साध्य होते. असे असतांनाही कृपाळू श्रीरामरायाने वानरांसाठी भक्तीचे वरदान मागण्यामागील कारणे पुढीलप्रमाणे होती.
१. वानरांनी स्वतःला श्रीरामाच्या कार्यात पूर्णपणे समर्पित करत झोकून देऊन श्रीरामाची सेवा केली.
२. वानरांनी स्वतःचा कोणताच विचार न करता श्रीरामाच्या प्रत्येक आज्ञेचे पूर्ण श्रद्धेने आज्ञापालन केले.
श्रीरामप्रभूच्या कार्यात संपूर्ण समर्पित झालेल्या वानरांच्या या उदाहरणातून शिकायला मिळते, ‘आपण भगवद़्कार्यात स्वतःला झोकून दिल्यास भगवंतालाच सर्वार्थांनी आपला उत्कर्ष करण्याची तळमळ लागते. तोच सर्वार्थांनी भार वाहून आपला उद्धार करतो. तो भक्तीसारखी अनमोल गोष्ट भक्ताला सहजतेने प्रदान करतो.’
श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या अवतारी कार्यात आपण स्वतःला झोकून दिल्यास ते आपली चित्तशुद्धी आणि भक्तीवृद्धी निश्चितच करणार आहेत. श्री गुरूंचे आज्ञापालन करून त्यांनी सांगितलेली व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यास त्याद्वारे आपल्यातील ‘समर्पणभाव’ वाढेल.
साधकांनो, ‘करुणावत्सल श्री गुरूंच्या कृपाप्रवाहात आपल्या सर्वांचाही उद्धार होणारच आहे’, या श्रद्धेने स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी निःशंक राहून गुरुसेवारत राहूया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.३.२०२३)