ठाणे पोलिसांनी बजावली ७ जणांना नोटीस
मनसे नेते अविनाश जाधव यांना दिलेल्या धमकीचे प्रकरण
ठाणे, २९ मार्च (वार्ता.) – मुंब्रा येथील वन विभागाच्या जागेतील अनधिकृत दर्ग्यांवर कारवाई केली नाही, तर त्याशेजारी हनुमान मंदिर बांधण्याची चेतावणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली होती. त्यानंतर जाधव यांना धमकी दिल्याचा संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. ठाणे पोलिसांनी व्हॉट्सअॅप गटाच्या प्रमुखासह ७ जणांना नोटीस बजावली आहे.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा शहरात वन विभागाच्या जागेत उभा असलेल्या दर्गा, मशीद आणि मजार यांच्या विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. तसेच वरील चेतावणी दिली होती.
चेतावणीनंतर सामाजिक माध्यमांवर अविनाश जाधव यांच्या छायाचित्राला फुल्ली मारलेली चित्रफीत प्रसारित झाली होती. त्यात एक धमकीचा संदेशही होता. हा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर या प्रकरणी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नौपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हलिमा शेख, अश्फाक सौदागर, सोहेल लतीफ मिस्त्री, कैफ रियाजुद्दीन सिद्दिकी, सिराज शेख यांना नोटीस बजावली आहे. तसेच मुख्य आरोपी व्हॉट्सअॅप गटाचा सदस्य जुनेद रिझवी आणि व्हॉट्सअॅप गटाचा प्रमुख (अॅडमिन) अश्फान जाफर सय्यद या दोघांना ४१ नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.