भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे पुणे येथे दीर्घ आजाराने निधन
पुणे – येथील भाजपचे खासदार गिरीश बापट (वय ७२ वर्षे) यांचे २९ मार्च या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. ‘नम्र स्वभावाचे, कष्टाळू, तसेच लोककल्याणाचे कार्य करणारे प्रभावी नेते’ असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेश व्यक्त केला आहे.
गिरीश बापट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजकारणाला आरंभ केला. महाराष्ट्र भाजपच्या उभारणीत आणि त्यानंतर पक्ष बळकट करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. ‘टेल्को’ आस्थापनात कामगार नेतेपदापासून चालू झालेली त्यांची वाटचाल वर्ष १९८३ मध्ये नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, पुण्याचे पालकमंत्री, आमदार, राज्याचे मंत्री आणि खासदार या टप्प्यापर्यंत येऊन पोचली. ३ वेळा नगरसेवक आणि ५ वेळा आमदार पदी राहिल्यानंतर ‘कसबा मतदारसंघ आणि गिरीश बापट’ असे समीकरणच बनले. नुकत्याच झालेल्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात आजारी असतांनाही ते दिसले होते. दांडगा जनसंपर्क हे त्यांचे एक प्रमुख वैशिष्ट्य होते. शासकीय पद्धतीने (इतमामात) त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.