प्रभु श्रीरामाविषयी भावजागृतीचे प्रयत्न करतांना दैवी बालकांचा भाव जागृत होऊन सूक्ष्मातून रामतत्त्वासमवेत हनुमानाचे तत्त्वही जाणवणे !
१. श्रीरामाच्या संदर्भातील भावप्रयोगाच्या वेळी दैवी बालकांना आलेल्या अनुभूती
‘६.६.२०२२ या दिवशी दैवी बालकांचा सत्संग झाला. या सत्संगाचा आरंभ श्रीरामाच्या भावपूर्ण स्मरणाने झाला. सर्वांना श्रीरामतत्त्व अनुभवता आले. त्यानंतर सत्संगाच्या पहिल्या सत्रात कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हिने श्रीरामाच्या संदर्भातील एक भावप्रयोग घेतला. तिने प्रभु श्रीरामाच्या अयोध्येचे वर्णन, श्रीरामप्रभूंचे अयोध्यावासियांना झालेले दर्शन आणि त्यामुळे त्यांची झालेली भावजागृती, यांविषयी सांगितले. त्या वेळी साधकांना पुढील अनुभूती आल्या.
१ अ. ‘सत्संगापूर्वी मला शारीरिक थकवा होता. भावप्रयोग केल्यानंतर थकवा पूर्णतः न्यून झाला.’– कु. वैदेही खडसे
१ आ. भावप्रयोगातील प्रत्येक क्षण ‘अयोध्यारूपी रामनाथी आश्रमातच घडत आहे’, असे जाणवणे : ‘रामनाथी आश्रम म्हणजेच अयोध्या आहे. गुरुदेवांनी आपल्याला अयोध्येत रहाण्याची संधी दिली आहे. हे आपले परम भाग्यच आहे. भावप्रयोगातील प्रत्येक क्षण ‘अयोध्यारूपी रामनाथी आश्रमातच घडत आहे’, असे मला जाणवत होते.’ – कु. वेदिका दहातोंडे (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के)
१ इ. ‘हा भावप्रयोग करतांना मला सूक्ष्मातून श्रीरामतत्त्वासमवेत हनुमानाचे तत्त्वही जाणवले.’ – कु. वैदेही सावंत (वय १३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के)
(‘प्रत्यक्षात सत्संगातील पुढील विषय श्री हनुमानाच्या श्रीरामभक्तीवर होता. त्याविषयी साधिकांना काही ठाऊक नव्हते. कु. वैदेहीप्रमाणेच अन्य काही जणांना तो विषय चालू होण्यापूर्वीच हनुमानाचे तत्त्व अनुभवता आले.’ – कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१ ई. ‘कलियुगातील भूवैकुंठामध्ये सर्व दैवी बालके उपस्थित असून तेथे हा सत्संग आणि भावप्रयोग चालू आहे’, असे मला जाणवले.’ – कु. शर्वरी कानस्कर (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१ उ. सत्संगात साक्षात् श्रीरामप्रभु अवतरल्याचे जाणवणे : ‘भावप्रयोग चालू असतांना मनात ‘स्वये श्रीरामप्रभु ऐकती, कुश-लव रामायण गाती’, हे ‘गीतरामायणा’तील गीत मला आठवले आणि ‘या सत्संगात साक्षात् श्रीरामप्रभु अवतरले असून आम्ही सर्व दैवी बालके या भावप्रयोगाच्या माध्यमातून लव-कुशांप्रमाणे त्यांचे गुणगान करत आहोत’, असे मला जाणवले. – कु. सायली देशपांडे (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
२. सत्संगात श्री हनुमानाची उच्चतम रामभक्ती दर्शवणार्या दोन कथा सांगणे
२ अ. श्री हनुमानाची कथा ऐकतांना साधक भावविभोर होणे : यानंतर सत्संगात कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हिने श्री हनुमानाची उच्चतम रामभक्ती दर्शवणार्या दोन कथा सांगितल्या. पहिल्या कथेचा विषय होता, ‘हनुमानाला हृदयात श्रीरामाचे दर्शन होणे’ आणि दुसरा विषय होता, ‘श्रीरामभक्तीत हनुमान दंग होऊन त्याच्यात भोळाभाव निर्माण होणे.’ त्या कथा ऐकतांनाही काही साधक भावविभोर झाले आणि काही जणांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले.
२ आ. हनुमानाच्या कथांचे बोधामृत सांगितल्यावर सत्संगात त्रेतायुगातील वातावरण कार्यरत होऊन आनंद जाणवणे : कु. प्रार्थना पाठक हिने हनुमानाच्या श्रीरामाप्रती असलेल्या आदर्श भक्तीविषयी सांगितले. तेव्हा सर्वांना हनुमंताचा तो भाव अंतर्मनापासून जाणवत होता आणि सत्संगात त्रेतायुगातील वातावरण कार्यरत होऊन आनंदाची स्पंदने जाणवत होती.
२ आ १. कु. प्रार्थना पाठक हिने हनुमानाच्या भावाविषयी केलेले विश्लेषण
अ. कु. प्रार्थना पाठक हिने ‘हनुमानाच्या मनातील भाव कसा होता ?’ याविषयी सांगितले. तिने सांगितले, ‘साक्षात् श्रीरामप्रभु प्रत्यक्ष माझ्या हृदयात असून तेच माझे रक्षण करतात’, असा हनुमानाचा भाव होता. आपण साधकांनीही असा भाव मनात ठेवला पाहिजे. आपली काही पात्रता नसूनही गुरुदेव आपल्याला सेवा करण्याची संधी देतात; म्हणून आपण सतत कृतज्ञताभावात राहूया.’
आ. ‘प्रभु श्रीरामचंद्राला प्रिय होण्यासाठी मी काय करू ?’ असे हनुमानाच्या सतत मनात असायचे. ‘श्रीरामस्मरण आणि श्रीराम हेच माझे जीवन’, असा त्याला सतत ध्यास असायचा.’
३. परात्पर गुरु डॉक्टरांनी कु. अपाला औंधकर हिला ‘गुरुदेवांचे आवडते होण्यासाठी काय करावे ?’ याविषयी सूक्ष्मातून सुचवलेली सूत्रे
अ. ‘जर आपल्याला गुरुदेवांचे प्रिय व्हायचे असेल, तर आपल्यातही हनुमानासम भक्ती असायला हवी.
आ. ‘ज्या गोष्टीत श्रीराम नाहीत, अशी गोष्ट मारुतिरायांना नको वाटायची’, असा मारुतिरायांचा भाव होता.
इ. आपण म्हणतो,‘ गुरुदेव चराचरात आहेत.’ असे आहे, तर ‘अशी कोणती गोष्ट आहे, ज्यात ते नाहीत ?’ याचे उत्तर म्हणजे ‘स्वभावदोष आणि अहं यांमध्ये गुरुदेव नाहीत; परंतु स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेत गुरुदेव नक्कीच आहेत !’ गुरुदेव स्वभावदोष आणि अहं यांमध्ये नसल्याने आपल्याला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायचे आहे.’
४. ‘सूक्ष्मातून हृदयमंदिरात कोणाचे दर्शन होते ?’ याविषयीचा कु. अपाला औंधकर हिने केलेला प्रयोग
कु. अपालाने सर्व साधकांना एक प्रयोग करायला सांगितला. तिने सर्व साधकांना आपापल्या हृदयाच्या ठिकाणी उजवा हात ठेवून ‘हृदयाच्या ठोक्यांमध्ये काय जाणवते ? सूक्ष्मातून हृदयमंदिरात कोणाचे दर्शन होते ?’ असा प्रयोग करण्यास सांगितला. त्या वेळी काही साधकांना पुढील अनुभूती आल्या.
४ अ. गुरुदेव प्रत्येकाच्या हृदयात असून स्वभावदोष आणि अहं यांमुळे ते न दिसणे; म्हणून स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवणे आवश्यक असणे : ‘मला हृदयाला स्पर्श केल्यावर ‘श्रीविष्णूप्रती असणार्या भावलहरी दिसल्या आणि हृदयात पिवळा प्रकाश दिसला. त्या वेळी माझा ‘गुरुदेव, गुरुदेव’ असा नामजप चालूच होता. नंतर मला हृदयात सूक्ष्मातून अथांग सागर दिसला. मी विचार केला, ‘हा सागर काय दर्शवत आहे ?’ तेव्हा गुरुदेवांनी सूक्ष्मातून उत्तर दिले, ‘हा सागर म्हणजे समष्टी सागर आहे. तुला पुष्कळ समष्टी सेवा करायची आहे.’ त्यांनी असे सांगितल्यावर माझी भावजागृती झाली. ‘हृदयी वससी परि नच दिससी, कैसे तुज पाहू ?’ असा व्याकुळ भाव जागृत झाला आणि जाणवले, ‘गुरुदेव तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहेत. केवळ आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे ते आपल्याला दिसत नाहीत; म्हणून आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवायची आहे.’ – कु. अपाला औंधकर
४ आ. ‘माझा ‘श्री विष्णवे नमः’ हा नामजप आपोआप चालू झाला. गुरुदेवांचे लघुरूप माझ्या हृदयमंदिरात दिसले आणि गुरुदेवांचे स्मरण होत होते.’ – सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
४ इ. ‘गुरुदेवच सर्वस्व आहेत आणि तेच सर्वत्र आहेत’, अशी जाणीव झाली आणि प्रत्येकाच्या हृदयात ते आहेत; म्हणून ‘प्रत्येक साधकाकडे मी त्या दृष्टीने पहायला हवे’, हे माझ्या लक्षात आले.’ – कु. सायली देशपांडे
४ ई. ‘मन हळूहळू शांत झाले आणि माझा ‘गुरुदेवा, नारायणा’ असा जप आपोआप चालू झाला.’ – कु. शर्वरी कानस्कर
४ उ. ‘आपले हृदय गुरुदेवच चालवतात. ‘देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर !’ या उक्तीप्रमाणे मला अनुभूती आली. हा देह गुरुदेवांचे मंदिरच आहे आणि हृदय, अर्थात् जे मंदिराचा गाभारा आहे, ते साक्षात् परमेश्वर स्वरूपच आहे.’ – कु. प्रार्थना पाठक
५. सत्संगाच्या वेळी सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे
‘गुरुदेवांच्या अनंत कृपेमुळे या संपूर्ण सत्संगात वेगळेच वातावरण अनुभवता आले. त्या वेळी सूक्ष्मातून पुढील सूत्रे लक्षात आली.
अ. ‘आजचा सत्संग त्रेतायुगात होत आहे’, असे जाणवले.
आ. सत्संगात श्रीरामतत्त्व आणि गुरुतत्त्व पुष्कळ प्रमाणात जाणवत होते. वातावरणात भावलहरी प्रक्षेपित झाल्या होत्या.
इ. शेवटी कृतज्ञता व्यक्त करतांना सर्वांच्या हृदयात एक ज्योत प्रज्वलित झाली. ती श्रीरामस्वरूप होती. त्या ज्योतीमुळे हृदयातील अंधःकार दूर होऊन हृदयमंदिर प्रकाशमान झाले.
ई. सर्व दैवी बालक सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे लिहून घेत असतांना लिखाणाच्या माध्यमातून ज्ञानतत्त्व कार्यरत होऊन साधकांच्या हृदयातील भावामुळे ते अंतर्मनापर्यंत पोचले. त्यामुळे साधकांची प्रयत्नांच्या दिशेने वाटचाल झाली.
उ. सत्संगात बर्याच जणांना ग्लानी येत होती. ती अनिष्ट शक्तीमुळे येत होती.
६. प्रार्थना आणि कृतज्ञता
हे श्रीरामस्वरूप गुरुदेवा, केवळ तुमच्या अनंत कृपेमुळे आम्हाला दैवी सत्संगात इतके दिव्य वातावरण अनुभवता येऊन पुष्कळ शिकायला मिळाले. हे नारायणा, इथे जे काही शिकायला मिळाले आहे, ते तुम्हीच आमच्याकडून कृतीत आणून घ्या. हे गुरुदेवा, असा सत्संग मिळाल्याने आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१२.६.२०२२)
|