आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या
ठाणे, २९ मार्च (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक आणि अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेले पोलीस हवालदार वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. २९ मार्चला सकाळी ९ वाजता निळजे ते तळोजा या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान रेल्वेगाडीखाली उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. सध्या ते मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून एस्.पी.यू. शाखेत कार्यरत होते.
जीतेंद्र आव्हाड हे मंत्री असतांना ते आव्हाड यांचे अंगरक्षक होते. त्या वेळी अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना ठाणे पोलिसांनी अटकही केली होती.
आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अनंत करमुसे यांच्यावर आक्रमण केल्याचा आरोप कदम यांच्यावर होता. कदम यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. त्यांच्या आत्महत्येची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. कदम यांच्या आत्महत्येमुळे लोकांमध्ये उलटसुलट चर्चा चालू झाली आहे.