आम्ही अशा निर्जनस्थळी असलेल्या शाळांवर पोचायचे कसे ? – पन्नाशी ओलांडलेल्या पावणेतीनशे शिक्षकांचा प्रश्न
पुणे – आमचे आता वय झाले आहे. कुणी वयाची पन्नाशी ओलांडली, तर कुणी ५३ वर्षे पूर्ण केली आहेत. या वयात आम्हा शिक्षक-शिक्षिकांपैकी अनेकांना मधुमेह, रक्तदाब (बीपी), मणक्याचे आजार, गुडघेदुखी अशा आजारांनी गाठले आहे. अशा वयात स्वतःच्या तालुक्यातील शाळा मिळावी. ही आम्हा सर्वांची माफक अपेक्षा असते; परंतु या वयात आमचे अतीदुर्गम भागातील शाळांवर स्थानांतर केले आहे. यापैकी काही शाळांना १२ मास किमान १ घंटा बोटीतून आणि त्यानंतर किमान दीड ते दोन घंटे डोंगरदर्या आणि निर्जन भागांतून पायपीट करत शाळांवर जावे लागणार आहे. या वयात आम्ही अशा निर्जनस्थळी असलेल्या शाळांवर पोचायचे कसे ? असा प्रश्न जिल्ह्यातील वयाची पन्नाशी ओलांडलेल्या पावणेतीनशे शिक्षकांनी केला आहे.
शिक्षकांच्या स्थानांतराच्या सहाव्या फेरीत २७४ शिक्षकांचे स्थानांतर हे अतीदुर्गम भागातील शाळांवर झाले आहे. यापैकी १७४ उपशिक्षक आणि १०० पदवीधर शिक्षक आहेत. वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना स्थानांतर प्रक्रियेतून वगळण्यात येत असले, तरी या २७४ पैकी ५५ शिक्षक हे वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेली आहेत. वयाच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी ३० जून २०२२ अशी समयमर्यादा ग्राह्य धरण्यात आल्याने ही नवी समस्या पुढे आली आहे. तसेच अतीदुर्गम भागात स्थानांतर झालेल्यांमध्ये १५३ शिक्षिकांचा समावेश आहे.
विविध गोष्टींचा विचार करून आम्हा सर्वांना स्वतःच्या तालुक्यातील शाळेवर नियुक्ती मिळणे आवश्यक आहे. विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अनोळखी, अतीदुर्गम ठिकाणी नेमणूक देतांना महिलांना प्राधान्याने वगळणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारने स्थानांतराचा ६ वा टप्पा रहित केला पाहिजे, अशी मागणी सर्व शिक्षकांनी प्रशासनाला केली आहे.
संपादकीय भूमिकाशिक्षकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वतःहून यावर तोडगा काढला पाहिजे ! |