श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर रेल्वे स्थानक) येथील बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू करावे !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत रेल्वे प्रशासनाला निवेदन
कोल्हापूर – प्रवाशांना अल्पदरात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भारतभरातील विविध रेल्वे स्थानकांवर ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ स्थापित केल्या आहेत; मात्र श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर रेल्वे स्थानक) येथे बसवण्यात आलेले ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ बंद अवस्थेत आहे. कोल्हापूरसह वळीवडे, रुकडी, हातकणंगले आणि जयसिंगपूर या रेल्वे स्थानकांवरील मशीनही बंद आहेत. कोल्हापूर रेल्वे स्थानकांमध्ये असलेले पाण्याचे नळ जवळजवळ ५० टक्के बंद आहेत, तसेच तेथे अस्वच्छताही पुष्कळ प्रमाणात आहे. तरी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर रेल्वे स्थानक) येथील बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू करावे, या मागणीचे निवेदन, हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत रेल्वे प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील रेल्वे उपस्टेशन अधीक्षक मेहता यांनी स्वीकारले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणित सुराज्य अभियानाचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. शिवानंद स्वामी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष घालून नागरिकांच्या समस्या का सोडवत नाही ? |