उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी बाँब ठेवल्याचा दूरध्वनी !
नागपूर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानासमोर बाँब ठेवण्यात आला आहे, असा धमकीचा दूरध्वनी नागपूर पोलिसांना २७ मार्चच्या रात्री आला. यानंतर नागपूर पोलिसांच्या बाँब शोधक पथकाने रात्री १२ वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाची पडताळणी केली; परंतु हा दूरध्वनी बनावट दूरभाष (फेक कॉल) असल्याचे त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले.
बाँब ठेवल्याचा दूरध्वनी करणारी व्यक्ती हा वैयक्तिक कारणामुळे दुखावला होता. घरातील वीज गेली असल्याने संतापून या व्यक्तीने फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर बाँब ठेवल्याची धमकी दिली आहे. पोलिसांची केवळ दिशाभूल करण्यासाठी या व्यक्तीने हा बनावट दूरभाष (फेक कॉल) केला. या व्यक्तीला पोलिसांनी कह्यात घेतले असून पुढील कारवाई केली जात आहे, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.