सातारा येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !
सातारा, २७ मार्च (वार्ता.) – मोदी आडनावावरून टीका करतांना ओबीसी समाजाचा अपमान करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सातारा येथे भाजपच्या वतीने ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले.
शहरातील शिवतीर्थावर भाजपच्या सातारा शहर, ग्रामीण, जावळी आणि कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत हे आंदोलन केले. ५० हून अधिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडेही मारण्यात आले.
या वेळी भाजपचे शहराध्यक्ष म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून राहुल गांधी देशाचे संविधान नाकारत आहेत. वर्ष २०१९ मध्ये कर्नाटकमध्ये मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजाचा अपमान केला होता. न्यायालयाने याविषयी गांधी यांना दोषी ठरवत शिक्षा ठोठावली आहे. राहुल गांधी हे घराणेशाहीमुळे राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडलेले दिसत नाहीत, हेच त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध होते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. त्यामुळे ते न्यायदेवता आणि संविधान यांचा अवमान करत आहेत.