मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर दरात १८ टक्क्यांची वाढ !
१ एप्रिलपासून दरवाढ चालू !
मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पथकर दरात १८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणार्यांना पथकरासाठी १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागेल. वर्ष २००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या पथकरामध्ये दर ३ वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार वर्ष २०२३ मधील पथकर दरात वाढ होत आहे. याआधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. १ एप्रिल २०२३ या दिवशी लागू होणारे पथकराचे दर वर्ष २०२३ पर्यंत कायम असतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे.