गुढीपाडव्यानिमित्त गोवा दूरदर्शनवर सनातनच्या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत
पणजी – गोवा दूरदर्शनवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या साधिका सौ. समृद्धी गरुड यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत सौ. गरुड यांनी गुढीपाडव्याविषयी सविस्तर माहिती दिली.
सौ. गरुड म्हणाल्या की, हिंदु संस्कृतीनुसार आपण जे सण, व्रते आणि उत्सव साजरे करतो, त्यातून चैतन्याची निर्मिती होऊन माणसाला ईश्वराच्या जवळ जाण्यास साहाय्य होते. गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि नैसर्गिक कारणे आहेत. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. एक हिंदू म्हणून आपल्याला आपल्या धर्माविषयी माहिती असली पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला हिंदु धर्मशास्त्र शाळेत शिकवले जात नाही. ‘जो धर्माचे रक्षण करतो त्याचे ईश्वर रक्षण करतो’, असे भगवंताचे वचन असून त्यामुळे आपण धर्माचे रक्षण करायला हवे. हिंदूंनी धर्मशास्त्राचा अभ्यास करावा आणि ही माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवावी.’’ सनातनने हिंदु धर्मशास्त्रासंबंधी अनेक ग्रंथ प्रकाशित केले असल्याची माहितीही सौ. गरुड यांनी या वेळी दिली.