गुन्हेगारांवर ‘वचक’च हवा !
पुणे येथील वानवडी भागात अज्ञात व्यक्तींनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा जवळपास ३० हून अधिक वाहनांच्या दगड मारत काचा फोडून तोडफोड केली, तसेच काही घरांवरही अज्ञात व्यक्तींनी दगड मारले. पुणे येथील वाहन तोडफोडीची आणि दगडफेकीची घटना, हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशा घटना अनेक ठिकाणी आणि वारंवार घडत आहेत, हे उघड सत्य आहे. जनतेच्या दृष्टीने हा विषय अतिशय संवेदनशील आणि मनामध्ये भय, असुरक्षितता निर्माण करणारा आहे. त्यामुळे समाजातील वाढती दुष्प्रवृत्ती आणि गुन्हेगारी वृत्ती नष्ट करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. या वाढत्या झुंडशाहीला वेळीच आवर न घातल्यास याचे गंभीर परिणाम जनतेला भोगावे लागणार आहेत, हे संतापजनक आहे.
यातून सामान्यांची आर्थिक, शारीरिक हानी तर होतच आहे, तसेच जनतेला दहशतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमधून गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही, हे सूत्र पुन्हा एकदा अधोरेखित होते. चोरी, घरफोडी, तसेच जबरी चोरी करणार्या सराईतांनाही पकडल्यानंतर त्यांना गंभीर शिक्षा न झाल्याने ‘काही होत नाही’, या अविर्भावात गुन्हेगार पुन्हा गुन्हे करत आहेत. तसेच गुन्हेगार उद्दाम होत आहेत. परदेशात पोलिसांचा वावर सर्वत्र दिसत नाही; मात्र त्यांचा गुन्हेगारांवर अप्रत्यक्षरीत्या धाक आहे; कारण गुन्हा झाल्यावर गुन्हेगारांवर अल्प कालावधीमध्ये अपेक्षित शिक्षा केली जाते. हे चित्र आपल्याकडे दिसण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत. काही ठिकाणी गुंडगिरी करणार्यांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचेही लक्षात येते. कारणे कोणतीही असली, तरी वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेणे आणि त्यांना लोकप्रतिनिधींनीही साहाय्य करून ‘गुन्हेगारांवर दहशत बसेल’, असा वचक निर्माण करायला हवा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुनावणीसाठी आलेले प्रकरण तातडीने तडीस नेले जायचे. त्यामुळे जनतेमध्ये कुणावर अन्याय करायचा नाही, ही भावना प्रबळ होती. ‘जग शिक्षेवर चालते’, या सुवचनानुसार आजच्या कायद्याचे भय नसलेल्या स्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रशासन व्यवस्थेचा आदर्श घेऊन पोलीस आणि न्याययंत्रणा सक्षम केल्यास गुन्हेगारी रोखणे अशक्य नाही.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे