कांदळी (जिल्हा पुणे) येथे संताच्या वंदनीय उपस्थितीत हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना !
जुन्नर (जिल्हा पुणे), २८ मार्च (वार्ता.) – जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील २२ एकर शेतामध्ये २७ मार्च या दिवशी श्री हनुमानच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘श्री रामचंद्र देव ट्रस्ट’ आणि ‘प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट’ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलमय पावन पर्वासाठी नर्मदातीरावरील (मोरटक्का, मध्यप्रदेश) येथील प.पू. बर्फानी बाबा, नाशिक येथील प.पू. राम प्रभु महाराज, मुंबई येथील प.पू. गोखले महाराज, मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील पू. योगी भीमनाथ, बडवानी (मध्यप्रदेश) येथील योगी गोश्वरनाथ आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) ज्येष्ठ सुपुत्र पू. नंदूदादा कसरेकर या संतांच्या वंदनीय उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे यजमानपद प.पू. बाबांचे सुपुत्र श्री. सुनील दि. कसरेकर आणि स्नुषा सौ. नयना सु. कसरेकर यांनी भूषवले. श्री. नीलेश गोडबोले, श्री. रवींद्र रमेश पेठकर, श्री. सौरभ सचिन जोजार, श्री. श्रीपाद वासुदेव अग्निहोत्री, श्री. किशोर राम अत्रे यांनी पौरोहित्य केले. कार्यक्रमास प.पू. भक्तराज महाराज यांचा भक्त परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.