काँग्रेसच्या आमदाराला ९९ रुपयांचा दंड !
पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण
नवसारी (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फाडल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने काँग्रेसचे आमदार अनंत पटेल यांना ९९ रुपयांचा दंड ठोठावला. पटेल यांनी दंड भरला नाही, तर त्यांना ७ दिवसांचा कारावास भोगावा लागू शकतो. १२ मे २०१७ या दिवशी नवसारी कृषी विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांच्या वेळी कुलपतींच्या खोलीत घुसून पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र फाडले होते.
न्यायालयाने शिक्षा सुनावतांना म्हटले की, या गुन्ह्यासाठी ३ मासांचा कारावास आणि ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली जाते; मात्र आमदारांचा निदर्शनांचा हेतू विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचा होता. त्यांची पद्धत मात्र चुकीची होती. त्यामुळे त्यांना शिक्षा करण्याऐवजी दंड ठोठावणे योग्य होईल. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या मानसिकतेपासून ते दूर रहातील.