सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी खारूताईच्या घेतलेल्या भावजागृतीच्या प्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘२१.४.२०२१ या श्रीरामनवमीच्या दिवशी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी ‘श्रीरामरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वानररूपी साधकांवर असलेली कृपा आणि खारूताईचे उदाहरण अन् देवाला अत्यंत तळमळीने आळवणे’, हा भावजागृतीचा प्रयोग घेतला. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. खारूताईसारखी छोटीशी सेवा अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भावपूर्ण केल्यावर गुरूंची कृपा होणे : खारूताईची क्षमता नसूनही तिने तिच्या परीने वाळू अंगावर घेऊन रामसेतूवर झटकली. तिची छोटाशी; पण अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भावपूर्ण कृती पाहून श्रीरामाने प्रसन्न होऊन तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिचा उद्धार केला. यावरून ‘रामराज्यासाठी छोटीशी सेवा भावपूर्ण आणि शरणागतीने केली, तरी गुरु प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा करतात’, हे शिकायला मिळाले.
२. खारूताईसारखी शरणागत आणि समर्पण भावाने सेवा केल्यावर अनेक पटींनी गुरुकृपा होणे : आपण दिवसातून अनेक प्रकाराच्या सेवा केल्यावर थोडीशी गुरुकृपा होते. आपणही खारूताईसारखी शरणागत आणि समर्पण भावाने सेवा केली, तर आपल्यालाही अनेक पटींनी गुरुकृपा संपादन करता येईल.
३. खारूताईचे छोटेसे प्रयत्न बघून देवाने तिचा उद्धार करणे : खारूताईचे छोटेसे प्रयत्न बघून देवाने तिचा उद्धार केला. म्हणजे ‘देव आपल्याला किती देऊ शकतो ?’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या दैवी प्रसंगातून ‘साधकांनी साधनेचे प्रयत्न किती वाढवायला पाहिजेत ?’, हेसुद्धा लक्षात आले.
४. भावजागृतीचा प्रयोग ऐकतांना आलेल्या अनुभूती
४ अ. श्रीराम, त्याची वानर सेना आणि खारूताईचा प्रसंग अनुभवता येणे : कु. तेजलताईने घेतलेला भावजागृतीचा प्रयोग म्हणजे आम्हाला त्रेतायुगात घेऊन जाण्यासाठी केलेला एक प्रयोग आणि आम्ही त्यात रममाण झालो. श्रीराम, त्याची वानर सेना, खारूताईचा प्रसंग असे एक-एक करून आम्हाला ते सर्व अनुभवता येत होते.
४ आ. भावजागृतीचा प्रयोग संपवल्यावरही साधकांची भावस्थिती टिकून रहाणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात ब्रह्म सामावले असल्याचे दिसणे : कु. तेजलताईने भावजागृतीचा प्रयोग संपवल्यावरही आम्हा सर्वांची भावस्थिती टिकून होती. त्यामध्ये ‘रामरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले विराट रूपात असून सर्व ब्रह्म त्यांच्यात सामावले आहे’, असे मला दिसले. ‘भावावस्थेचे रूपांतर ध्यानावस्थेत कधी झाले ?’, हे मला कळले नाही.
४ इ. गुरुदेवांच्या कृपेमुळे आपतत्त्वाची अनुभूती येणे : त्या वेळी माझ्या तोंडाला गोड चव आली. श्रीरामाने मला सूक्ष्मातून प्रसाद दिला आणि कृतज्ञता वाटली. तेजलताईचा उत्कट भाव आणि गुरुदेवांची कृपा यांमुळे मला प्रथमच आपतत्त्वाची अनुभूती आली.
५. दुसर्या दिवशीही श्रीरामाचेच स्मरण होणे : भावजागृतीचा प्रयोग झाल्यानंतर दुसर्या दिवशीही मला केवळ रामाचे स्मरण होत होते. माझ्या स्वप्नात श्रीराम, विचारांत श्रीराम आणि माझे वैयक्तिक आवरतांनाही मला श्रीरामाचेच स्मरण होत होते. देवाने मला इतका वेळ भावावस्थेत ठेवले.
देवाने भावजागृतीच्या प्रयोगातून दिलेल्या या अनमोल सत्संगासाठी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. म्रिण्मयी केळशीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.४.२०२१)
|