व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी (वय ११ वर्षे) !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
चैत्र शुक्ल अष्टमी (२९.३.२०२३) या दिवशी पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
कु. मृणाल नीलेश जोशी हिला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जन्म ते ३ वर्षे
१ अ. ‘कु. मृणाल हिचा जन्म झाल्यावर पहिले ३ मास ती पुष्कळ शांत होती. त्यानंतर ती पुष्कळ रडत असे. त्या वेळी आरती आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावल्यावर ती शांत होत असे.
१ आ. अंगावर अनेक दैवी कण दिसणे : ती ५ मासांची असतांना एकदा मी स्नानानंतर तिचे अंग पुसत होते. तेव्हा ‘तिच्या अंगावर अनेक दैवी कण आहेत’, असे माझ्या लक्षात आले. तिच्या डोक्यापासून पायापर्यंत अनेक दैवी कण चमकत होते. असे दैवी कण नियमितपणे तिच्या अंगावर दिसतात.
१ इ. समंजसपणा : मृणाल अडीच वर्षांची असतांना मी नेपाळ येथे भूकंपग्रस्त भागात ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने साहाय्य कार्य मोहिमेसाठी ३ आठवडे गेले होते. या कालावधीत मी तिला माझ्या बहिणीकडे ठेवले होते. त्या वेळी ती तिच्या मावशीला कोणताही त्रास न देता आनंदाने राहिली. त्या वेळी मी तिच्याशी एकदाही बोलले नव्हते आणि तिनेही माझी एकदाही आठवण काढली नाही. जेव्हा तिला कुटुंबीय ‘आई कुठे गेली ?’, असे विचारत, तेव्हा ‘आई सेवेला गेली आहे’, असे ती सांगायची. ती शांत राहिल्यानेच मी सेवा करू शकले.
२. वय ४ ते ६ वर्षे
२ अ. सात्त्विकतेची आवड : तिच्या कृती सात्त्विक असतात, उदा. दोन वेण्या घालणे, कुंकू लावणे इत्यादी. तिला सात्त्विक वेशभूषा करायला आवडते.
२ आ. तिची आवड-नावड अल्प आहे. त्यामुळे तिला दिलेला पदार्थ ती आनंदाने खाते.
२ इ. प्रेमभाव : ती घरात रुग्णाईत असलेल्या व्यक्तीला औषध देते. ‘त्यांना बरे वाटावे’, यासाठी ती प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावते. ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांमुळे रुग्णाईत व्यक्तीला बरे वाटेल’, असा तिचा भाव असतो.’
– सौ. प्रीती नीलेश जोशी (कु. मृणालची आई), पुणे
२ ई. ‘आम्ही एकत्र खेळत असतांना ती सर्वांना सामावून घेते.
२ उ. ती नेहमी हळू आवाजात आणि नम्रतेने बोलते.
२ ऊ. ती पुष्कळ सहनशील आहे.
२ ए. सुंदर हस्ताक्षर आणि नीटनेटकेपणा : तिचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. तिचे लिखाण आणि वह्या स्वच्छ अन् नीटनेटक्या असतात. यासाठी तिच्या वह्या इतर विद्यार्थ्यांना दाखवल्या जायच्या.
२ ऐ. शिकण्याची वृत्ती : जेव्हा मी सेवा करत असतो, तेव्हा ती माझ्या समवेत बसून सेवा शिकून घेते. ती सत्संगाला आणि शिबिराला माझ्या समवेत बसते. ती सर्व सूत्रे तिच्या वहीत लिहून घेते. काही मासांपूर्वी ‘ऑनलाईन दोन दिवसांचे साधना शिबिर’ झाले होते. या शिबिरात ती दोन्ही दिवस माझ्या समवेत पूर्णवेळ बसली होती. या शिबिरात सांगितलेली सर्व सूत्रे तिने लिहून घेतली. शिबिरातील स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचा विषय तिने लिहून घेतला आणि त्याप्रमाणे तत्परतेने प्रयत्नही चालू केले.’
– कु. ऋग्वेद नीलेश जोशी (कु. मृणालचा भाऊ, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), पुणे
३. वय ६ ते १० वर्षे
३ अ. ‘ती प्रत्येक कृती ‘आश्रमसेवा’, या भावाने करते.
३ आ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : तिने ‘नामजप कसा शोधायचा ? उपाय कसे करायचे ? स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे लिखाण कसे करायचे ?’, हे शिकून घेतले. ती नियमितपणे सारणी लिखाण करते. ‘सारणीत लिहिलेल्या चुका आणि सूचना योग्य आहेत ना ?’, हे ती साधकांना विचारते.
३ इ. सध्या करत असलेले साधनेचे प्रयत्न : ती शाळेत जाण्यापूर्वी ‘अधिकाधिक नामजप कसा होईल ?’, यासाठी प्रयत्न करते. ती प्रतिदिन भावपूर्ण पूजा करते. ती घरात लावलेल्या फलकावर नियमितपणे भावजागृतीचे विविध प्रयोग लिहून ठेवते. ती प्रतिदिन नामजपादी उपाय करते आणि ‘इतरांचेही उपाय नियमित व्हावेत’, यासाठी सर्वांना स्मरण करून देते. ती व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देते. तिच्याकडून चूक झाल्यावर ती लगेचच क्षमायाचना करते. ती रात्री झोपतांना न चुकता क्षमायाचना आणि प्रार्थना करते.
३ ई. समष्टी साधनेचे प्रयत्न : ती शाळेतील तिच्या मैत्रिणींना सात्त्विक उत्पादनांची माहिती सांगते. तिने तिच्याकडील सनातनचा ‘प्रार्थना’ हा लघुग्रंथ तिच्या मैत्रिणींना वाचण्यासाठी दिला होता.
३ उ. प्रथमोपचार पेटी सिद्ध करणे : तिने प्रथमोपचार शिबिरात सहभाग घेतला होता. त्यानुसार तिने सरावही केला. प्रथमोपचार शिबिर झाल्यावर तिने तत्परतेने सर्वांच्या साहाय्याने प्रथमोपचार पेटी सिद्ध केली आहे. त्यामध्ये लागणारे सर्व साहित्य तिने पेटीत योग्य पद्धतीने ठेवले आहे. एकदा तिच्या आजींची मलमपट्टी (‘ड्रेसिंग’) करतांना आधुनिक वैद्यांना सर्व साहित्य प्रथमोपचार पेटीत व्यवस्थित मिळाले.
३ ए. कृतज्ञताभाव : तिच्या मनामध्ये प.पू. भक्तराज महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व संत यांच्याप्रती अपार कृतज्ञताभाव आहे. ती वापरत असलेल्या वस्तूंविषयी तिला कृतज्ञता वाटते. त्यामुळे ती प्रत्येक वस्तू नीटनेटकेपणाने हाताळते. ‘भ्रमणभाष हा आपला गुरुसेवक आहे’, या कृतज्ञताभावाने ती भ्रमणभाष हाताळते.
३ ऐ. ती प्रतिदिन ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेऊन झोपते.
४. स्वभावदोष
राग येणे आणि मनमोकळेपणाचा अभाव
‘हे गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळेच मृणालमधील ही गुणवैशिष्ट्ये आमच्या लक्षात आली. ‘तिच्याकडून आणि आम्हा सर्वांकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. नीलेश अच्युत जोशी (कु. मृणालचे वडील), पुणे
(सर्व लेखातील सूत्रांचा मास : जून २०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.