नवनाथांचा पदोपदी लाभणारा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या ! – मिलिंद चवंडके, अभ्यासक, नाथ संप्रदाय
भिंगार – कलियुगात मानवांना शाश्वत सुखाचा आधार देण्याकरिता नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले. अलौकिक सामर्थ्याचे दर्शन घडवत नवनाथांनी जीवनोपयोगी संदेश दिले. हे संदेश आपणास आजही पदोपदी मार्गदर्शक ठरतात. संदेशरूपाने नवनाथांचा लाभणारा आधार अनुभवत जीवनाचा आनंद घ्या, असे आवाहन नाथ संप्रदायाचे अभ्यासक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.
येथील नेहरू चौकामधील श्रीचैतन्य कानिफनाथ देवस्थानने (आस्थाना) आयोजित केलेल्या गुढीपाडवा महोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी श्री. सागर फुलारी यांनी स्वागत केले. श्री. रणजित रासकर यांनी परिचय करून दिला, तर श्री. नवनाथ भालके महाराज यांच्या हस्ते श्री. चवंडके यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. चवंडके पुढे म्हणाले, ‘‘नवनाथांनी प्रापंचिकांची दुःखे दूर करतांना प्रपंचात गुंतून न पडता आत्मोध्दार करून घेण्याचे मार्गदर्शन केले. नाथांनी कडक ब्रह्मचर्य, योगसाधना आणि शिवोपासना यांद्वारे हिंदु धर्माला शुद्धतेच्या उच्च पातळीवर नेले, तसेच सदाचाराचे महत्त्व वाढवले. वामाचारी विकृत साधनांच्या निर्मूलनासाठी आणि भारतीय धार्मिक जीवनाच्या शुद्धीकरणासाठीच नवनाथ अवतरले. नाथांना शरण गेल्यास ते आपल्या दैनंदिन जीवनात पावलोपावली सोबत असल्याचे अनुभवास येते.’’
भिंगारला आध्यात्मिक वैभव प्राप्त करून देण्यास कटिबद्ध व्हा !
दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तपश्चर्या केल्याने काशीविश्वेश्वर प्रगट झाले ते शुक्लेश्वर स्थान समंगा नदीकाठी भिंगारमध्येच आहे. याच नदीत स्नान केल्याने नारदमुनींचे पुत्र अष्टवक्र यांना अव्यंग देहाची प्राप्ती झाली. समंगा नदीचा अलीकडे भिंगारनाला झाला आहे. समंगा नदीस पूर्वीचे पावित्र्य प्राप्त करून दिल्यास भिंगारचा सर्वांगीण विकास होईल. येथील शुक्लेश्वर या नाथपंथी शिवालयाची माहिती पेशव्यांनाही होती; म्हणूनच पानिपतकडे निघताना भाऊसाहेब पेशवे यांनी भिंगारचे पाण्याखाली जाणारे शुक्लेश्वराचे देऊळ वर काढून बांधा, अशी आज्ञा दिली होती. त्या आज्ञेचे पालन न झाल्याने आजही हे मंदिर पावसाळ्यात पाण्यात जात असल्याचे दिसते. भृगूऋषींची तपोभूमी असलेल्या, नाथ, दिनकरस्वामी, चक्रधरस्वामी आदी संतांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भिंगारला आध्यात्मिक वैभव प्राप्त करून देण्याकरिता तरूणांनी कटीबद्ध व्हावे, असे आवाहन श्री. चवंडके यांनी केले.