आनेवाडी पथकर नाक्यावर स्थानिकांकडून पथकर मुक्तीची मागणी !
सातारा, २७ मार्च (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग निर्माण करत असतांना अनेक शेतकर्यांनी आपल्या भूमी महामार्गासाठी दिल्या. तरीही स्थानिक नागरिकांना पथकरातून मुक्ती दिली जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थ आनेवाडी पथकरनाका व्यवस्थापनाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. याविषयी आनेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींनी पोलिसांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाल्यानंतर पथकरमुक्ती मिळण्याची मागणी स्थानिक शेतकरी वारंवार करत आहेत. पथकर नाक्याच्या जवळच भुईज, पाचवड अशा मोठ्या बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांना माल नेण्यासाठी मोठमोठ्या वाहनांद्वारे पथकरनाक्यावरून नेहमीच ये-जा करावी लागते. यामुळे शेतकर्यांना पथकर द्यावा लागतो. अनेक शेतकर्यांना स्वतःच्या निवासस्थानापासून शेतामध्ये जायचे झाले, तरी पथकर द्यावा लागत आहे. यामुळे आधीच सरकारी धोरणे, अवकाळी पाऊस आणि त्यातच पथकर व्यवस्थापनाकडून होत असलेला त्रास, यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आनेवाडी पंचक्रोशीतील दरे खुर्द, सायगाव, पवारवाडी, रायगाव, पाचवड या गावांतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून २ एप्रिल या दिवशी पथकर मुक्तीविषयी मोर्चा काढण्याची चेतावणी आनेवाडी पथकर आणि पोलीस प्रशासनाला दिली आहे.