वृक्ष लागवड आणि संवर्धन यांसाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री
पुणे येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्कार वितरण सोहळा
पुणे – जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला उपयोगात येणार्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वृक्ष लागवड आणि संवर्धन यांसाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वन विभाग वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांसमवेत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील वनेतर क्षेत्रातील वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या व्यक्ती अन् संस्था यांना देण्यात येणार्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री’ पुरस्काराच्या वर्ष २०१८ आणि २०१९ या वर्षीच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचा वितरण सोहळा यशदा येथे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण डॉ. सुनीता सिंह आदी उपस्थित होते. या वेळी ‘संत तुकाराम वनग्राम’ योजनेंतर्गत पुरस्कारांचेही संयुक्त व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आले.
श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, ‘वनश्री’ पुरस्कार पाहिल्यावर वृक्ष लावण्याची ऊर्जा प्राप्त होईल आणि इतरांना कर्तव्याची जाण होईल. संपूर्ण जगात जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाविषयी चिंता व्यक्त होत आहे. पर्यावरणाने भरभरून दिले असतांनाही माणूस वसुंधरेचे शोषण करत आहे. माणसाला जगवण्याची क्षमता निसर्गात आहे. म्हणून वृक्ष संवर्धन संस्कृती वाढावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने युनिसेफ समवेत सामंजस्य करार केलेला आहे. त्यानुसार राज्यातील ३३ लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या अनुषंगाने जलसंधारण, पर्यावरणरक्षण आदी कार्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत एक ‘व्हर्चुअल’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला आहे. त्यात या विषयाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.