माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन पुन्हा फेटाळला !
पुणे – शिवाजीराव भोसले सहकारी बँक अपव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर्.एन्. हिवसे यांनी हा निकाल दिला. बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी भोसले यांच्यासह ७ जणांविरोधात दोषारोपपत्र प्रविष्ट केले आहे. भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत असून जामीन मिळवण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. भोसले यांनी एकाच वेळी मुंबई उच्च न्यायालय आणि पुणे विशेष न्यायालय या दोन्ही ठिकाणी जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र दोन्ही न्यायालयांपुढे या संदर्भातील माहिती लपवून न्यायालयाची फसवणूक केल्याचा युक्तीवाद गुंतवणूकदारांचे अधिवक्ता सागर कोठारी यांनी केला. भोसले यांनी यापूर्वी वैद्यकीय कारणास्तव केलेल्या तात्पुरत्या जामिनाची मागणी आर्.एन्. हिवसे न्यायालयाने फेटाळली होती.