कुंभलगडावर अजान देण्याच्या अनुमतीमुळे मेवाडच्या शौर्याचा अवमान ! – भाजपचे आमदार
कुंभलगडाच्या संदर्भात पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण
राजसमंद (राजस्थान) – जिल्ह्यातील ऐतिहासिक कुंभलगड किल्ल्यावर मुसलमानांना अजान देण्याची अनुमती देण्यात आली. असे करून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस सरकारने राजस्थानच्या शौर्याचा अवमान केला आहे, असे वक्तव्य भाजपचे स्थानिक आमदार सुरेंद्रसिंह राठौर यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी ‘हिंदूंचा सूर्य’ म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या मेवाडच्या महाराणांच्या कर्मभूमीवर भगवा ध्वज फडकावण्याचे आवाहन केले. यात त्यांनी काय चुकीचे म्हटले ? जर धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई झाली, तर त्यांच्या पाठीशी संपूर्ण मेवाड उभा राहील. कुंभलगडावर अजान होता कामा नये.’
२३ मार्च या दिवशी कुंभलगड गावात धीरेंद्र शास्त्री आणि देवकीनंदन ठाकुर यांचा कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये दोघांनी कथित चिथावणीखोर वक्तव्ये केल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी ५ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
पंडित धीरेंद्र शास्त्री कार्यक्रमाला संबोधित करतांना म्हणाले होते, ‘आम्ही कुणाच्या वडिलांना घाबरत नाही. आम्ही कुंभलगड किल्ल्यावर भगवा ध्वज फडकावू ! किल्ला १०० हिरवे ध्वज लावले आहेत, ते काढून किल्ला भगवामय बनवायचा आहे.’ दुसरीकडे देवकीनंदन ठाकुर म्हणाले होते, ‘जो हिंदु राष्ट्र बनवील, तो गादीवर (सत्तेवर) परतेल.’
या कार्यक्रमानंतर दुसर्या दिवशी पहाटे ५ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज आणून किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. (हिंदुद्वेषी काँग्रेसच्या राज्यातील पोलिसांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार ? – संपादक)