साकिनाका (मुंबई) येथील भीषण आगीत २ जणांचा मृत्यू !
मुंबई – साकीनाका येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत होरपळून २ कामगारांचा मृत्यू झाला. दुकानातील अन्य ९ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मृत्यू झालेल्या कामगारांचे नाव राकेश गुप्ता (वय २२ वर्षे) आणि गणेश देवासी (वय २३ वर्षे) असे आहे.
आगीत सापडलेल्या दोन्ही कामगारांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. २६ मार्चच्या मध्यरात्री साकीनाका मेट्रो स्थानकाच्या जवळील राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर या दुकानाला आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशमनदलाला कळवले. त्यानंतर त्वरित अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी आले. दुकानामध्ये अडकलेल्या अन्य कामगारांना बाहेर काढण्यात जवानांना यश आले. सकाळी ७.३० वाजेपर्यंत अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले.