सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘सायटिका’ हा विकार दूर होण्यासाठी दिलेला नामजप केल्यावर वेदना पूर्ण थांबल्याची अनुभूती घेणार्या सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५३ वर्षे) !
१. रात्री झोपल्यानंतर ‘सायटिका’च्या त्रासामुळे उजव्या पायामध्ये असह्य वेदना होेणे
‘मागील एक आठवड्यापासून माझ्या उजव्या पायाची एक नस (शीर) अल्पाधिक प्रमाणात दुखत होती. वैद्यांना विचारले असता, त्यांनी ‘हा ‘सायटिका’चा (कटीपासून (कंबरेपासून) पायाच्या मागील भागापर्यंत पसरणार्या वेदना) त्रास आहे’, असे सांगितले. २६.११.२०२२ या दिवशी रात्री मी झोपले असतांना माझ्या उजव्या पायामध्ये असह्य वेदना चालू झाल्या. वेदनेची तीव्रता एवढी होती की, मला पाय थोडाही हलवता येत नव्हता. मी काही वेळ वेदना सहन करण्याचा प्रयत्न केला; परंतु वेदना सहन न झाल्याने मला रडू आले.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लेखानुसार ‘सायटिका’ हा विकार दूर होण्यासाठी असलेला नामजप भावपूर्ण करतांना ‘त्या त्या देवतेचे तत्त्व मिळत आहे’, असे जाणवणे
मी ‘सायटिका’ हा विकार दूर होण्यासाठी सद़्गुरु गाडगीळकाका यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिलेल्या लेखातील ‘श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमो भगवते वासुदेवाय – श्री हनुमते नमः – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप भावपूर्ण करण्यास आरंभ केला. मी ज्या देवतेचा नामजप करत होते, त्या देवतेच्या मंदिरात जाऊन देवतेच्या चरणांवर डोके ठेवून नामजप करत आहे’, असा भाव ठेवला, उदा. मी ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप करतांना मी दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन देवीच्या चरणांवर डोके ठेवून नामजप करत होते, तसेच ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करतांना मी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर यांच्या खोलीत जाऊन विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या चरणांवर डोके ठेवून नामजप करत होते. ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप करतांना मी मारुतिरायांच्या चरणांवर डोके ठेवून नामजप करत होते, तर ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करतांना मी त्र्यंबकेश्वर येथील शिवाच्या मंदिरातील शिवपिंडीवर डोके ठेवून नामजप करत होते. अशा प्रकारे प्रत्येक देवतेचा नामजप करतांना त्या त्या देवतेचे स्मरण करून आणि देवतेच्या चरणांवर डोके ठेवून नामजप केल्यावर मला ‘त्या त्या देवतेचे तत्त्व मिळत आहे’, असे अनुभवता आले.
३. केवळ ४५ मिनिटांच्या भावपूर्ण नामजपाने ‘सायटिका’च्या वेदना पूर्णपणे थांबणे
‘केवळ अर्धा घंटा भावपूर्ण नामजप केल्यावर माझ्या पायातील वेदना ६० टक्के उणावल्या’, असे मला जाणवले. माझा नामजप जसा होत गेला, तशा वेदना उणावून पायाची हालचाल होऊ लागली. केवळ ४५ मिनिटे नामजप केल्यावर माझ्या पायातील वेदना पूर्णपणे थांबल्या. मला पाय हलवता येऊ लागून चालता येऊ लागले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४. ‘परात्पर गुरु डॉक्टर यांनी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांंच्या माध्यमातून दिलेले नामजप केल्यावर अल्प कालावधीत आणि परिणामकारक उपाय होऊन तीव्र स्वरूपाच्या वेदनाही दूर होतात’, असे अनुभवता येणे
या वेदना न्यून होण्यासाठी ‘अॅलोपॅथी’ची गोळी घेतली, तरी एवढ्या प्रमाणात आणि अल्प वेळेत वेदना दूर होत नाहीत; परंतु ‘परात्पर गुरुदेवांनी सद़्गुरु गाडगीळकाकांच्या माध्यमातून दिलेला नामजप केल्यावर अल्प कालावधीत आणि परिणामकारक उपाय होऊन तीव्र स्वरूपाच्या वेदनाही दूर होऊ शकतात’, हे मी या प्रसंगातून अनुभवले.
परात्पर गुरुदेवांनी हे नामजपाचे उपाय शोधून आणि ते साधकांना करायला सांगून साधकांवर अपार कृपाच केली आहे. ‘हे उपाय भावपूर्ण केल्यास त्याचा जलद गतीने लाभ होतो’, हे मी या प्रसंगातून अनुभवले. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली !’
– (पू.) सौ. संगीता जाधव ( सनातनच्या ७४ व्या समष्टी संत, वय ५३ वर्षे), ठाणे सेवाकेंद्र (३०.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |