भारताच्या पालटत्या परराष्ट्र धोरणामुळे त्याची पालटलेली प्रतिमा !
भारताचे पालटते आक्रमक परराष्ट्र धोरण हे महासत्तेच्या दृष्टीने मार्गक्रमित व्हावे, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
गेल्या काही मासांपासून खरे तर काही वर्षांपासून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा पालटण्यास प्रारंभ झाला आहे. भारत शासनाने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे या पालटणार्या प्रतिमेचा वेग प्रचंड वाढत असल्याचे गेल्या काही दिवसांत अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. गेली ७ दशके जागतिक पातळीवर भारताची निर्माण झालेली प्रतिमा पालटायला वेळ लागणार, हे अपेक्षित होते; पण ती इतक्या लवकर पालटेल, याची पुष्कळ शक्यता अल्प जाणवत होती. एकेकाळी जागतिक पातळीवर ‘न्यूट्रल’ (तटस्थ) किंवा कोणत्याही बाजूने न झुकणारा, तसेच जागतिक मुद्यांवर सोडाच; पण आपल्या घरातील सूत्रांवरही ‘संयत प्रतिमा असणारा देश’, अशी भारताची एक प्रतिमा जागतिक स्तरावर होती. त्यामुळे भारताच्या मताला कुणी विचारात घेत नव्हते आणि त्याला किंमतही दिली जायची नाही.
१. पूर्वी असलेली भारताची गळचेपी भूमिका
भारत म्हणजेच ‘देशाचे राजकीय नेतृत्व करणारे लोक, मंत्री हे काय बोलतात ? किंवा त्यांच्या बोलण्यामागे जागतिक पटलावर काही स्थित्यंतर येऊ घातली आहेत का ?’, असे प्रश्न कधीच कोणत्या देशाला अथवा त्यांच्या राजकीय नेतृत्वाला पडलेले नव्हते. भारताची भूमिका काय असावी ? हेही अनेकदा परदेशी शक्ती, विकसित देश किंवा भारताच्या भूमिकेचे चित्र जागतिक पातळीवर उभे करणारे ‘टूलकिट’ (एखादी विचारसरणी पुढे रेटण्यासाठी राबवण्यात आलेली योजना) ठरवत असे. ज्यात मोठ्या मोठ्या न्यूज एजन्सी (वृत्तसंस्था), पत्रकार, संस्था आणि इतर लोक होते. ज्यांचे स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अनेकदा भारताला गळचेपी भूमिका घ्यावी लागत होती.
२. सध्या भारताकडे भूमिका पालटण्याचे धाडस असलेले खंबीर नेतृत्व
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात ? भारताने एखाद्या सूत्रावर व्यक्त झाल्यावर युरोपियन राष्ट्रांची भूमिका काय असेल ? रशियाला एखादी गोष्ट आवडेल कि आवडणार नाही ? देशातील अल्पसंख्यांकांची भूमिका काय असेल ? अशा अनेक गोष्टींवर भारताची प्रतिक्रिया गेल्या ७० वर्षांत अवलंबून राहिलेली होती. अर्थात् ती पूर्णपणे चुकीची होती, असे मला अजिबात वाटत नाही; कारण परिस्थिती तशी होती; पण अनेकदा परिस्थिती अनुकूल असूनसुद्धा भारताची भूमिका पालटण्याचे धाडस असलेले खंबीर नेतृत्व देशाकडे त्या काळी नव्हते, हे आपल्याला मान्य करावेच लागेल; पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही.
३. भारताच्या भूमिकेवर जागतिक भूमिका ठरवली जाणे
आज भारत आत्मविश्वासाने पुढे जात आहे. आज अनेक आघाड्यांवर भारताची भूमिका काय असेल ? याकडे जगाचे लक्ष लागलेले असते. भारताच्या भूमिकेवर जागतिक भूमिका आज मांडली जाते. या गोष्टीला दुजोरा देणार्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतांना आपण आज अनुभवत आहोत. तुर्कीये हा देश खरे तर भारताचा शत्रू म्हणावा लागेल; पण त्यांच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताने केलेले साहाय्य आज जगात चर्चेचा विषय ठरलेले आहे. हे साहाय्य केवळ भारत सरकारपर्यंत मर्यादित नाही, तर देशातील लोकांनी स्वहस्ते केलेल्या साहाय्याचा ओघ अजून थांबत नाही. हा ओघ इतका मोठा आहे की, तुर्कीयेच्या भारतातील कार्यालयात भारतियांनी पाठवलेल्या साहाय्याला सामावून घेण्यासाठी जागा नसल्याचे ट्वीट तुर्कीयेच्या राजदूतांनी केले आहे. हे सगळे भारत कशा पद्धतीने जागतिक स्तरावर साहाय्याला उभा रहातो आहे, याचे प्रतीक आहे.
४. एका मासात ३ राष्ट्रप्रमुखांनी भारताला भेट देणे
फेब्रुवारी आणि मार्च या मासांत जगातील ३ राष्ट्रप्रमुख भारतात आले. ज्यात २५-२६ फेब्रुवारीला जर्मन चॅन्सलर ओलॉफ शॉल्झ, त्या पाठोपाठ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज भारतात येऊन गेले आहेत. आता फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात येत आहेत. एकाच वेळी युरोपातील ३ प्रमुख राष्ट्रांचे प्रमुख भारतात का येत आहेत ? तेही अवघ्या एका मासाच्या आत ! हे चित्र पुष्कळ काही विचार करायला लावणारे आहे.
५. जागतिक पटलावर भारताच्या विरुद्ध कुणीही बोलण्याचे धाडस न करणे
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने मांडलेली संयत आणि तटस्थ; पण दायित्वाची भूमिका जागतिक पटलावर नोंदली गेली आहे. आज भारत कुणाच्या बाजूने झुकतो, यापेक्षा तो आपल्या विरुद्ध जाऊ नये, यासाठी त्या त्या देशांचे प्रतिनिधी सगळे प्रयत्न करत आहेत. याच एक बोलके उदाहरण म्हणजे जर्मनीचे भारतातील राजदूत फिलिप अकरमन यांनी आपल्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी आधीच ‘भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे, हा जर्मनीसाठी चिंतेचा विषय नाही’, हे सांगून जर्मनीची भूमिका स्पष्ट केली आहे. याचा अर्थ काय, तर भारत रशियाशी काय व्यवहार करतो ? यात जर्मनी ढवळाढवळ करणार नाही. जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांची भेट ही जर्मनी आणि भारत हितसंबंधांसाठी आहे. त्याचा भारताच्या रशिया-युक्रेन युद्ध भूमिकेशी काही देणे-घेणे नाही.
माझ्या ज्ञात इतिहासात तरी जर्मनीसारख्या प्रगत युरोपियन राष्ट्राने अशी उघड भूमिका घेतल्याचे माझ्या वाचनात नाही. भारताने काय करावे ? अथवा काय करू नये ? हे त्याला आजवर सांगत आलेला युरोप आज स्वतः चुकूनसुद्धा भारताच्या विरुद्ध अथवा त्याला दुखावणारी भूमिका न मांडण्यासाठी स्पष्टीकरण देण्यासाठी आटापिटा करत आहे.
६. सध्या भारताकडे एखाद्याला झुकवण्याची शक्ती असणे
आज भारताकडे एखाद्याला झुकवण्याची मग ती आर्थिक असो वा सैनिकी किंवा इतर असो, अशी शक्ती आहे. तसे निर्णय घेणारी सरकारी यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व सध्या भारताकडे आहे. त्यामुळेच आज जग भारतापुढे झुकतांना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यासाठीच आज ‘दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये’, ही युक्ती भारताच्या प्रतिमेविषयी खरी होतांना दिसत आहे.
– श्री. विनीत वर्तक, अभियंता, मुंबई. (२३.२.२०२३)
(साभार : श्री. विनीत वर्तक यांच्या ‘ब्लॉग’वरून)