सरकारने दर्गा आणि मशिदीवर कारवाई करून मंदिरे उभारण्याची मनसेची मागणी !
पुणे येथील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराचे प्रकरण
पुणे – येथील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन्ही ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ उत्खनन चालू करून तिथे पुन्हा मंदिरे उभारावीत, अशी मागणी मनसेने केली आहे. ही मंदिरे कसबा पेठ परिसरात आहेत. त्यामुळे नव्याने निवडून आलेले आमदार रवींद्र धंगेकर यांनीही याचा इतिहास समजून घ्यावा आणि त्यांनीही यासंदर्भात विचार करावा, असेही आवाहन मनसेने धंगेकरांना केले आहे. या २ पुरातन मंदिरांविषयी मनसेने केलेल्या मागण्या आणि कारवाईची माहिती देणारी पत्रकार परिषद २५ मार्च या दिवशी मनसेने घेतली. या वेळी सरचिटणीस अजय शिंदे, मनसेचे अधिवक्ता योगेश देशपांडे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अजय शिंदे म्हणाले की, औरंगजेबाच्या सत्ताकाळातच हिंदूंची मंदिरे पाडून तिथे दर्गा आणि मशीद बांधली गेली आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरेही त्याच काळात पाडली जाऊन तिथे दर्गा उभारला आहे. या दोन्ही मंदिरांसाठी मनसेचा पूर्वीपासूनच लढा चालू आहे. पूर्वी येथे हिंदूंची मंदिरे होती, याविषयीचे प्राचीन अवशेष आणि पुरावेही सापडले आहेत.
अधिवक्ता योगेश देशपांडे यांनी सांगितले की, दर्ग्यासाठी खोदकाम केल्यावर मंदिरांचे अवशेष सापडले होते. पुरातत्व विभागाच्या अहवालातही यासंदर्भात नमूद केले आहे. त्यामुळे हा लढा अजिबात धार्मिक नाही.
पुण्येश्वर मंदिरासंदर्भात एका मासात कारवाई न केल्यास मनसेची आंदोलनाची चेतावणी !
पुण्येश्वर मंदिराच्या परिसरात मशीद उभारण्यात आल्याचे प्रकरण
अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ?
पुणे – येथील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात मशीद उभारण्यात आली आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. राज्यशासनाने यासंदर्भात एका मासात कारवाई करावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार आहे, अशी चेतावणी मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणुकीत पुण्येश्वर मंदिराच्या घोषणा दिल्या होत्या. या घोषणा राजकीय न रहाता त्यावर थेट कारवाई व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.