कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती !
‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ असे आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे असे वेगळेपण म्हणजे वैशिष्ट्य असते. मग ते संगीत, नृत्य, चित्रकला किंवा यासंबंधित इतर कला या माध्यमांतूनही असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा वेगळा गुणधर्म असतो. ईश्वराने प्रत्येकाला निराळेपण दिले आहे. असे असतांना डाव्या विचारसरणीचे काही लोक ‘साम्यवादा’वर जोर देतात, हे किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येते; कारण व्यक्ती तिच्या स्वभाव आणि गुणवैशिष्ट्ये यांनुसार वेगळी असतांना आपण सर्वांना एक समान गृहीत धरणे अयोग्य आहे. यावरूनच डाव्यांची संकुचितता लक्षात येते.
प्रत्येकाने स्वतःमधील गुणवैशिष्ट्ये ओळखून, ती विकसित करण्याकडे लक्ष दिले, तर आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आणि आनंदी होत जातो, तसेच आपल्यातील कलेच्या माध्यमातून आपण ईश्वरप्राप्तीकडे वाटचाल करू शकतो. एखादा कलावंत जेव्हा चित्र रेखाटतांना मन एकाग्र करतो, तेव्हा तो अप्रत्यक्षपणे ईश्वराच्या जवळच जात असतो; कारण यातून मनातील अनावश्यक आणि नकारात्मक विचार दूर करत असतो. त्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याप्रमाणे वातावरणातील ‘सत्त्व’ लहरी त्यांच्याकडे आकृष्ट होतात अन् त्याला दिव्यत्वाची प्रचीती येते. गायक जेव्हा एकाग्रतेने गाणे म्हणतो, तेव्हा तो सप्तसुरांच्या माध्यमातून नादलहरींशी एकरूप होऊ शकतो आणि ‘शरीर’ अन् ‘मन’ यांचे काही वेळातच अनुसंधान साधले जाते. संगीताच्या माध्यमातून असाध्य रोगांवरही मात करता येते; म्हणून अनेक ठिकाणी संगीताच्या माध्यमातून उपचार केले जातात.
‘कले’चे महत्त्व अनन्यसाधारण असून सद्यःस्थितीत त्याकडे आध्यात्मिक दृष्टीने न पहाता व्यावहारिक दृष्टीने पाहिले जात आहे. सध्या देवतांची अक्राळ-विक्राळ चित्रे रेखाटणे, देवतांच्या मूर्ती धर्मशास्त्रानुसार न घडवता अभिनेते किंवा अभिनेत्री, तसेच राजकारण्यांच्या रूपात घडवून आपणच आपल्या श्रद्धास्थानांचे विडंबन करत आहोत. हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. अशा विकृतींना वेळीच आळा बसवणे आवश्यक आहे. कलेचे बाजारीकरण न करता अध्यात्मीकरण कसे करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. ‘कलेसाठी कला’ न रहाता ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ असे होऊन त्याचा स्वतःसह समाजालाही लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
– श्री. जयेश बोरसे, पुणे