विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित !
|
मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – गेल्या २७ फेब्रुवारीपासून चालू असलेले विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ मार्च या दिवशी राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन १७ जुलै या दिवशी विधानभवन, मुंबई येथे होणार आहे, अशी घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी विधानपरिषदेत, तर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. या अधिवेशनात राज्यात अर्थसंकल्प संमत होण्यासमवेतच विधेयके संमत करण्यात आली. या अधिवेशनात सत्ताधार्यांनी कामकाज रेटून नेले, तसेच या अधिवेशनात संपूर्ण काळ सत्ताधार्यांचा वरचष्मा पहायला मिळाला. विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला असला, तरी सत्ताधार्यांनी त्याला दाद दिली नाही.
सभागृहातील कामकाज
अर्थसंकल्पीय अधिवेशनात २७ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत एकूण विधीमंडळाच्या १८ बैठका झाल्या. विधानसभेत प्रत्यक्ष कामकाज १६५ घंटे ५० मिनिटे इतके झाले. काही कारणांमुळे विधीमंडळाचा वाया गेलेला वेळ ४ घंटे ५१ मिनिटे इतका आहे. प्रतिदिन सरासरी ९ घंटे १० मिनिटे कामकाज चालले. विधानपरिषदेत प्रत्यक्षात १२५ घंटे २० मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज ६ घंटे ५७ मिनिटे झाले. सदस्यांची अधिकाअधिक उपस्थिती ९१.२२ टक्के होती, तर सदस्यांची एकूण सरासरी उपस्थिती ८०.६० टक्के होती.
तारांकित प्रश्न
सभागृहात एकूण ७ सहस्र ९८१ तारांकित प्रश्न प्राप्त झाले होते. त्यांपैकी ५०३ प्रश्नांना मान्यता देण्यात आली. सभागृहात ५५ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. अल्पसूचना ९ प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी ८ स्वीकारल्या नाहीत. केवळ १ अल्पकालीन सूचना प्राप्त झाली; मात्र त्यावर चर्चा झाली नाही.
लक्षवेधी सूचना
सभागृहातील अत्यंत महत्त्वाचे आयुध असलेल्या लक्षवेधी सूचना एकूण २ सहस्र ५५६ इतक्या प्राप्त झाल्या. त्यांपैकी ८३५ लक्षवेधी सूचना स्वीकारल्या गेल्या, तर १४५ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. नियम ५७ अन्वये १४१ सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी एकही सूचना मान्य न केल्याने चर्चा झाली नाही.
१७ विधेयके संमत
विधानसभेत अतिशय महत्त्वाची अशी १७ विधेयके संमत करण्यात आली. पुनर्स्थापनार्थ १७ विधेयके होती. ती सर्व मान्य झाली. ३ अशासकीय विधेयके प्राप्त झाली होती; मात्र एकही मान्य झाले नाही. एकही शासकीय ठराव अधिवेशनात झाला नाही, तर अभिनंदनाचा एकही प्रस्ताव झाला नाही. नियम २९३ अन्वये ५ सूचना प्राप्त झाल्या होत्या. पाचही सूचना मान्य करून त्यांच्यावर चर्चा झाली.