प्रतिदिन सकाळी बदाम किंवा मध आणि लिंबूपाणी घेणे योग्य आहे का ?
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १७०
‘प्रतिदिन सकाळी बदाम खा किंवा मध आणि लिंबूपाणी प्या’, असे संदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत असतात. सकाळी उठल्यावर सुकामेवा खाणारे किंवा मध अन् लिंबूपाणी, कोरफडीचा रस, दुधी भोपळ्याचा रस किंवा तांब्याभर पाणी पिणारे असंख्य लोक सापडतात. ‘असे करणे चुकीचे आहे’, हे सांगूनही त्यांना पटत नाही.
शरीर निरोगी रहाण्यासाठी जठराग्नी चांगला असणे आवश्यक आहे. सकाळी काहीही खायचे असेल, तर त्यापूर्वी पोट साफ व्हायला हवे. शरीर हलके असायला हवे आणि सडकून भूक लागायला हवी. ही लक्षणे निर्माण झाल्यावर पुरेसा आहार घ्यायला हवा. असे न करता सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, मध इत्यादी खाल्ल्याने जठराग्नी मंद होतो. त्यामुळे आपण नंतर जे काही खातो, ते नीट पचत नाही. यामुळे अनेक विकार निर्माण होतात. यामुळे सकाळी सुकामेवा, मध इत्यादी खाणे टाळावे. हे पदार्थ खायचेच झाले, तर दुपारी जेवणानंतर खावेत. तेही नियमित न खाता स्वतःच्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन कधीतरी खावेत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)