सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी व्यष्टी साधना आणि सेवा या माध्यमांतून साधकाला घडवणे
१. इतरांचा विचार करणे
‘वर्ष २०१८ मध्ये सद्गुरु सत्यवान कदम रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी नामजप करायचे. त्या वेळी काही कारणास्तव त्यांच्या नामजपादी उपायांच्या नियोजनामध्ये बरेच पालट व्हायचे. सद्गुरु दादा ते पालट सहजतेने स्वीकारायचे. एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास ते सांगायचे, ‘‘सेवेतील संबंधित साधकांना विचारून करूया. असे केल्यास आपल्यामुळे त्यांना अडचण येणार नाही. आपल्यातही विचारून करण्याची वृत्ती निर्माण होईल.’’ ते परिपूर्ण सेवा होण्यासाठी सतर्क असायचे. यातून ‘इतरांचा विचार कसा करायचा ?’, हे मला शिकायला मिळाले.
२. स्वतःच्या आचरणातून साधकाला घडवणारे सद्गुरु सत्यवान कदम !
सद्गुरु दादा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या खोलीत रहायला होते. ते खोलीत बसून भ्रमणसंगणकावर (लॅपटॉपवर) सेवा करायचे. एकदा खोलीची स्वच्छता करणार्या साधकाने त्यांना सांगितले, ‘‘सकाळी ९ वाजता खोलीची स्वच्छता करण्यासाठी येतो.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमची स्वच्छता होईपर्यंत मी अन्य ठिकाणी बसून सेवा करीन. तुमची स्वच्छता झाल्यावर मला कळवा. मग मी परत खोलीत येईन.’’
काही वेळाने खोलीची स्वच्छता करणार्या साधकाने त्यांना सांगितले, ‘‘मी ९ वाजता न येता १०.१५ वाजता येतो.’’ तेव्हा सद्गुरु दादा म्हणाले, ‘‘ठीक आहे. तोपर्यंत मी खोलीत बसतो.’’ नियोजनात २ – ३ वेळा पालट झाले, तरीही सद्गुरु दादा शांतपणे तो साधक जसे सांगत होता, त्याप्रमाणे स्वत:च्या नियोजनात पालट करत होते.
त्या वेळी स्वच्छता करणारा साधक म्हणाला, ‘‘सद्गुरु दादांना काही सांगितले की, ते ‘हो’ असेच म्हणतात. ते काहीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत किंवा आम्हाला आमच्या नियोजनातील चुका सांगत नाहीत.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘एरव्ही सद्गुरु दादा चुका लगेच सांगतात; मात्र या प्रसंगात ते मला ‘परेच्छेने कसे वागायचे आणि परिस्थिती कशी स्वीकारायची ?’, हे शिकवत आहेत.’
३. संत वचने केवळ वाचणे किंवा ऐकणे यांसाठी नसून आचरणात आणण्यासाठी असल्याचे सांगणारे सद्गुरु सत्यवान कदम !
मी सद्गुरु दादांना आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना महाप्रसाद वाढण्याची सेवा करत असे. ‘माझा वेळ वाचावा’, यासाठी सद्गुरु दादांनी मला त्यांच्या समवेत महाप्रसाद घ्यायला सांगितले. मी १ – २ दिवस महाप्रसाद घेतल्यानंतर माझ्या मनात विचार आले, ‘सद्गुरु दादा आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या समवेत महाप्रसाद घेणे योग्य नाही. त्यांना वाढायची सेवा करून मी त्या सेवेचा लाभ करून घ्यायला हवा किंवा तसे करता येत नसल्यास त्यांच्या समवेत महाप्रसाद घेण्यासाठी बसण्यापेक्षा दुसरीकडे बसूया.’ तसे मी सद्गुरु दादांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘माझ्या समवेतच बस.’’
माझ्या मनातील प्रतिमेच्या विचारांविषयी सद्गुरु दादांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘संतांकडे जायचे, तर माया आणि अभिमान सोडून जायचे’, (संतन के पास जईयो त्यज माया और अभिमान ।’) हे नुसते ऐकण्यासाठी नाही, तर देवाने ते प्रत्यक्ष तुम्हाला अनुभवायची संधी दिली आहे. ‘तुम्हाला संतांच्या समवेत महाप्रसाद ग्रहण करायला सांगितला’, ही गुरूंची कृपा आहे. संतांच्या जीवनातही ते साधकावस्थेत असतांना जे घडलेले असते, ते प्रत्येक साधकाच्या जीवनात साधना करतांना घडत असते, ते या प्रसंगामधून आपल्याला अनुभवता आले पाहिजे आणि देवाप्रती कृतज्ञ असायला हवे. त्यामुळे तू असे विचार परत करू नकोस आणि वर्तमानकाळात रहायचा प्रयत्न कर.’’
नंतर सद्गुरु गाडगीळकाकांनीही मला मार्गदर्शन केले, ‘‘संतांकडे जातांना आपण लहान मुलांसारखे निर्मळ मनाने जावे आणि तेथे आपल्याला काय शिकायला मिळते ?’, याकडे लक्ष असायला हवे.’’
मला प.पू. भक्तराज महाराज यांची आठवण झाली. प.पू. बाबांना त्यांच्या गुरूंना वाढतांना ‘काय वाढू नी काय नको’, असे व्हायचे. त्या वेळी ते देहभान विसरून ‘गुरूंना काय हवे ?’, याकडे लक्ष ठेवायचे. ‘मी तसे करण्यात अल्प पडलो’, याची मला जाणीव झाली. नंतर मला संतांना महाप्रसाद वाढण्यातील आनंद मिळायला लागला. त्या वेळी मला प.पू. बाबांचे भजन आठवायचे, ‘सद्गुरु येती ज्यांचे घरा । वाहे आनंदाचा झरा !’
४. साधकाला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी साहाय्य करणे
सद्गुरु दादा रामनाथी आश्रमात असतांना माझा व्यष्टी साधनेचा आढावा घ्यायचे. तेव्हा पायांवर सूज येते; म्हणून ते समोर एक स्टूल घ्यायचे आणि त्यावर पाय ठेवायचे. बर्याच वेळा मी त्या स्टुलासमोरच बसायचो. त्यामुळे सद्गुरु दादांच्या चरणांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्यामुळे माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण दूर होत असे. त्या वेळी सद्गुरु दादाही मला सांगायचे, ‘‘तुमच्यावरील त्रासदायक आवरण न्यून झाले आहे.’’ सद्गुरु दादा माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना ‘मला कुठेही ताण येणार नाही’, याची काळजी घ्यायचे. त्यामुळे मला मनमोकळेपणे बोलता यायचे आणि प्रसंगाचा विचार करून ‘मी कुठे चुकलो ?’, हे सांगता यायचे. ‘मी स्वयंसूचना कशा केल्या आहेत ?’, हेही ते स्वतः पहायचे आणि त्यात काही पालट असल्यास ते करायला सांगायचे. आश्रमात जे साधक स्वयंसूचना चांगल्या प्रकारे बनवतात, त्यांना स्वयंसूचना दाखवायला सद्गुरु दादा मला सांगायचे. ते आमच्यामध्ये इतरांना विचारून करण्याची वृत्ती वाढवत होते आणि ‘स्वयंसूचना कशा परिपूर्ण बनवायच्या ?’, हेही शिकवत होते. त्यामुळे मला व्यष्टी साधनेचा आढावा देतांना आनंदही मिळत असे.
काही प्रसंगांतील माझे स्वभावदोष मला सहजतेने स्वीकारता यावेत आणि समजायला सोपे जावेत, यासाठी सद्गुरु दादा ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण’ या ग्रंथातील काही सूत्रे मला वाचायला देत असत.
५. साधकामध्ये असलेली आसक्ती न्यून करणे
एकदा मी सद्गुरु सत्यवानदादा आणि सद्गुरु गाडगीळकाका यांना महाप्रसाद वाढून झाल्यानंतर मी त्यांच्या समवेत महाप्रसाद ग्रहण करायला बसलो. त्या वेळी त्या दोघांच्या ताटांत अनेक पदार्थ होते आणि माझ्या ताटात नेहमीचे महाप्रसादाचे पदार्थ होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. डॉक्टरांच्या समवेत जेवायला बसलो असतो, तर त्यांनी ताटातील काही पदार्थ मला निश्चितच दिले असते.’
असे २ – ३ दिवस झाल्यानंतर माझ्या मनातील विचार नाहीसा झाला आणि मला महाप्रसाद ग्रहण करतांना आनंद मिळू लागला. ज्या क्षणी असे होऊ लागले, त्याच क्षणी सद्गुरु दादा आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी एकाच वेळी त्यांच्या ताटातील पदार्थ माझ्या ताटात वाढले आणि म्हणाले, ‘‘तुम्हीही घ्या.’’ त्यानंतर ते प्रतिदिन त्यांच्या ताटातील काही पदार्थ माझ्या ताटात वाढू लागले. १ – २ दिवसांनी त्यांनी मला सांगितले, ‘‘उद्यापासून जे आमच्या ताटात आहे, तेच तुमच्या ताटातही वाढून घेत जा.’’
या प्रसंगातून ‘संत सूक्ष्मातून साधकाच्या मनातील विचार जाणून ते साधकाच्या आध्यात्मिक प्रगतीला पोषक असे आचरण करतात’, असे लक्षात आले. सद्गुरु दादा आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी माझ्या मनातील विचार जाणून माझी आसक्ती दूर केली.’
– श्री. दिनेश शिंदे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२३)
सद्गुरु सत्यवान कदम यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !शिकवण्याच्या भूमिकेत रहाण्यापेक्षा सतत शिकण्याच्या स्थितीत रहावे ! : ‘आपण नेहमी शिकण्याच्या भूमिकेत राहिल्यास आपल्याला सतत आनंद मिळतो आणि देवाकडून आपल्याकडे सातत्याने चैतन्याचा ओघ येत रहातो. ‘आपण शिकवण्याच्या भूमिकेत राहिल्यास आपल्यातील अहं कधी वाढतो ?’, ते आपल्याला कळतही नाही. आपल्यात कर्तेपणाची आणि ‘मी’पणाची जाणीव हळूहळू वाढत जाते अन् त्याविषयी आपल्या लक्षातही येत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्णत्वाला गेले असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. ते दत्तगुरूंप्रमाणे निसर्ग, प्राणी, पक्षी आणि लहान अन् मोठ्या व्यक्ती यांच्याकडून सातत्याने शिकत असतात. त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीमुळे ते संशोधनही करतात. आपण त्यांचे गुण आत्मसात करायला हवेत. संग्राहक : श्री. दिनेश शिंदे, (१८.३.२०२३) |
|