टपाल कार्यालयातील लज्जास्पद कार्यपद्धत !
माझ्या वडिलांचे ((कै.) पू. पद्माकर होनप यांचे) पोस्टाच्या पनवेल शाखेत पूर्वी खाते होते. वडील काही कारणास्तव पनवेल ऐवजी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात राहू लागले. वडिलांचे पोस्टात अधिकोषाच्या संदर्भातील कामे करतांना आलेले कटू अनुभव पुढे दिले आहेत.
१. एकदा माझ्या वडिलांना पनवेल पोस्टातून पैसे काढायचे होते. त्यासाठी मी गोवा येथील पोस्टात चौकशी केली असता, तेथील स्त्री-कर्मचारी मला म्हणाली, तुमच्या वडिलांनी पनवेल येथील खात्याचा बराच काळ वापर न केल्याने ते खाते बंद झाले आहे. त्यासाठी तुम्हाला पनवेल येथील शाखेत अर्ज देऊन खाते परत चालू करावे लागेल. आम्हाला पनवेल येथे जाऊन हे काम करणे शक्य नसल्याने मी या कामासाठी तेथील पोस्टाच्या एका एजंटचे साहाय्य घेऊन पनवेल पोस्टात अर्ज जमा केला.
एरव्ही पोस्टात अर्ज दिल्यावर खातेदाराचे बंद असलेले खाते २ दिवसांत चालू होते; पण वडिलांचे खाते अर्ज देऊन ८ ते १० दिवस होऊनही चालू झाले नाही. यासाठी मी त्या एजंटला संपर्क केला असता तो मला म्हणाला, आम्ही पोस्टात प्रत्यक्ष चौकशी करायला गेलो, तरी तेथील कर्मचारी आम्हाला दाद देत नाही. त्यासाठी तुम्ही माहितीजालावर ट्विटर अकाऊंट चालू करून इंडिया पोस्टवर ही अडचण मांडा (टीप). तेथे अडचण मांडल्यावर ती ३ दिवसांत सोडवणे पोस्टाला बंधनकारक आहे. तुमची अडचण ३ दिवसांत सुटेल. त्याप्रमाणे मी अडचण मांडल्यावर दोन दिवसांतच वडिलांचे खाते परत चालू झाले.
(टीप : ट्विटरवर ट्विट करणे, म्हणजे आपण एक लहान संदेश प्रसारित करणे होय. माहितीजालावर ट्विटर नावाचे एक अॅप डाऊनलोड करून त्यावर स्वतःच्या माहितीची नोंदणी करून आपले अकाऊंट सिद्ध करता येते.)
२. एकदा वडिलांना पोस्टाची धनादेश पुस्तिका (चेकबुक) हवी होते. त्यासाठी त्यांनी अर्ज करून त्या समवेत आवश्यक ती कागदपत्रे जोडून पनवेल पोस्टात पाठवले आणि त्यात वडील रुग्णाईत असल्याने चेकबुक घेण्यास ते पोस्टाच्या पनवेल शाखेत येऊ न शकल्याने ते गोवा येथील पत्त्यावर पाठवण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली; परंतु १० दिवस झाले, तरी ते मिळाले नाही; म्हणून मी ही अडचण माहितीजालावर ट्विटरद्वारे इंडिया पोस्टवर मांडली आणि त्यावर दोन दिवसांतच उत्तर मिळाले की, चेकबुक सिद्ध आहे. तुम्ही ते प्राप्त करण्यासाठी पनवेल शाखेत भेट द्या. यात वडील चेकबुक घेण्यासाठी पनवेल येथे जाऊ शकत नसल्याने ते गोव्याला पाठवावे, ही अडचण सुटली नव्हती. त्यामुळे ट्विटरद्वारे इंडिया पोस्टवर परत ही अडचण मांडली, तेव्हा पनवेल कार्यालयाने पोस्टाने वडिलांचे चेकबुक गोवा येथे पाठवले.
३. वडील गोवा येथे स्थायिक झाल्याने त्यांना पनवेल येथील पोस्टातील खाते गोवा येथे स्थानांतर (बदली) करायचे होते. त्यासाठीचे अर्ज आणि त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पोस्टाच्या पनवेल कार्यालयात पाठवण्यात आली होती. १० दिवस वाट पाहून ही प्रक्रिया झाली नव्हती; म्हणून ही अडचण मी ट्विटरद्वारे पुन्हा मांडली. त्यानंतर ३ दिवसांतच या अडचणीची नोंद घेऊन वडिलांच्या खात्याचे स्थानांतर पनवेलहून गोव्याला करण्यात आले.
४. वरील विषयाची निश्चिती करण्यासाठी मी गोव्यातील पोस्टात गेलो, तेव्हा तेथील स्त्री-कर्मचारी मला म्हणाली, संगणकीयदृष्ट्या तुमच्या वडिलांच्या पनवेल येथील खात्याचे स्थानांतर गोवा येथे झाले आहे; पण वडिलांनी पनवेलला खाते चालू करतांना जमा केलेली कागदपत्रे आमच्याकडे, म्हणजे गोव्याला प्राप्त झालेली नाहीत. ही कागदपत्रे आम्हाला पनवेलच्या पोस्टाच्या कार्यालयातून मिळत नाही, तोपर्यंत तुमच्या वडिलांना आमच्या शाखेतून पैसे काढता येणार नाही. त्यानंतर ही अडचण मी परत ट्विटरद्वारे इंडिया पोस्टवर मांडली. त्यानंतर ३ दिवसांत इंडिया पोस्टच्या ट्विटरवरून पुढील उत्तर मला मिळाले, पनवेल शाखेत खातेदाराने पूर्वी जमा केलेली कागदपत्रे सापडत नाहीत. त्यामुळे तुम्ही गोवा येथील शाखेत नव्याने कागदपत्रे जमा करावीत.
५. अशी सूचना मिळाल्यामुळे गोवा येथील पोस्टात वडिलांना नव्याने खाते चालू करण्यासाठी आवश्यक ते अर्ज, कागदपत्रे आणि त्यांची छायाचित्रे परत द्यावी लागली. वडील रुग्णाईत असल्याने आणि ते प्रत्यक्ष तेथे जाऊ शकत नसल्याने ही कागदपत्रे मी गोव्याच्या पोस्टात जमा केली. तेव्हा तेथील स्त्री-कर्मचारी मला म्हणाल्या, पोस्टात तुमचे वडील येऊ शकत नसल्याने आमचा एक कर्मचारी वडिलांना भेट देईल. आमची खात्री झाल्यावर वडिलांना खात्यातून पैसे काढता येतील. तेव्हा वडिलांना उपचारासाठी रोख पैशांची आवश्यकता असल्याने ही प्रक्रिया लवकर करण्यात यावी, अशी मी त्या स्त्री-कर्मचार्याकडे विनंती केली. त्यानंतर १० दिवस झाले, तरी पोस्टातील कर्मचारी वडिलांना पहाण्यासाठी आला नाही. त्यामुळे मी ही अडचण परत ट्विटरद्वारे इंडिया पोस्टवर मांडली. त्यानंतर २ दिवसांनी पोस्टातील एका कर्मचार्याने आश्रमात येऊन वडिलांची भेट घेतली.
६. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी पोस्टात अन्य एका कामानिमित्त गेल्यावर तेथील स्त्री-कर्मचारी रागाने मला म्हणाली, तुम्ही आमच्या तक्रारी ट्विटरवर कशाला देता ? तेव्हा मी त्यांना म्हणालो, तुमच्याकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता आणि आमच्या काही अडचणी होत्या. त्यामुळे आम्ही असे केले.
टपाल कार्यालयातील महिला अधिकार्याने माझ्याशी अयोग्य वर्तन केले असल्याने मी हा प्रसंग ट्विटरद्वारे इंडिया पोस्टवर मांडला. तेव्हा २ दिवसांतच मला ट्विटरद्वारे त्या संबंधित अधिकार्यास योग्य त्या सूचना देण्यात येतील, असे मला कळवण्यात आले.
७. वरील प्रसंगानंतर माझ्या लक्षात आले, पोस्टातील कर्मचारी आपल्या कामांना दाद देत नसतील, तर ट्विटरद्वारे इंडिया पोस्टवर आपल्या अडचणी मांडणे, हा त्यावर परिणामकारक उपाय आहे. ही सुविधा नसती, तर वरील कामे पूर्ण होण्यासाठी आणखी बराच काळ गेला असता आणि मला मनस्तापही सहन करावा लागला असता.
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०२१)
पोस्टातील कर्मचारी आपल्या कामांना दाद देत नसतील, तर ट्विटरद्वारे इंडिया पोस्टवर आपल्या अडचणी मांडणे, हा त्यावर परिणामकारक उपाय ! |
|