मधुराद्वैताचार्य संत श्रीगुलाबराव महाराज
२६ मार्च २०२३ या दिवशी अमरावती येथील प.पू. गुलाबराव महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
विसाव्या शतकात एका विलक्षण विद्वान महात्म्याने महाराष्ट्रात जन्म घेऊन भारतीय संस्कृती आणि धर्म यांच्या प्रचारामध्ये आश्चर्यजनक कार्य करून लोकांचे विशेष कल्याण केले. या महान् महापुरुषाचे नाव मधुराद्वैताचार्य श्रीगुलाबराव महाराज !
१. लहानपणीच कृष्णदर्शन होणे
महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात लोणीसारख्या लहानशा गावात संत गुलाबराव महाराज अवतीर्ण झाले. आईच्या मायेचे छत्र लहानपणीच हरपले आणि त्यांची लौकिक दृष्टी ते ९ व्या मासाचे असतांनाच गेली. बाह्य दृष्टी कायमस्वरूपी गेल्यावरही अंतर प्रज्ञाचक्षुत्व कायमस्वरूपी उघडले गेले. लहानपणापासूनच योगविद्येमध्ये त्यांचे असाधारण अधिकार प्रतीत होऊ लागले. कधी ते घंटोन्घंटे समाधी लावून देहभान विसरून बसून रहात, तर कधी बाळकृष्णाला आपल्याजवळ बोलावून त्याला जेवण ग्रहण करण्यास सांगत. कित्येक जन्मांच्या तपस्येनंतरच प्राप्त होणारे भगवंताच्या सगुण साकार रूपाचे दर्शन या महापुरुषाला बाल्यावस्थेपासूनच सहजतेने प्राप्त झाले होते. सच्चिदानंदघन श्रीकृष्णाच्या मूर्तीसह ते उड्या मारायचे, नाचायचे, हसायचे आणि खेळायचे. रात्रीच्या वेळी आतून खोली बंद करून ब्रह्मानंदात तल्लीन होऊन ते नाचायचे, गायचे आणि भजन करत रहायचे.
२. गुलाबराव महाराजांच्या अलौकिक बाललीला
गावामध्ये अद्भुत आणि अलौकिक लीलेमुळे ते सर्वांचे लाडके झाले होते. त्यांच्या शेजारच्या स्त्रिया त्यांच्या बालक्रीडा बघण्यासाठी गुपचूप येऊन उभ्या रहात असत, तेव्हा ते सर्वांची नावे एका पाठोेपाठ एक त्वरित सांगत. पहाता येत नसूनही तुम्ही आम्हाला कसे ओळखले ?, असे विचारल्यावर ते म्हणायचे, तुम्ही पायात घातलेली जोडवी, पैंजण आणि हातात घातलेल्या बांगड्या यांच्या आवाजावरून मी तुमचे नाव ओळखतो. एकदा त्यांच्या हातातून दिवटी (भिंतीवर लावलेला दिवा) खाली पडली. दिवटी पलंगावर पडून चादर आणि आजीची साडी जळू लागली. त्यांची आजी त्यांना रागाने मारायला धावली, तेव्हा ते निश्चयपूर्वक म्हणाले, आजी, तू चिंता करू नकोस. केवळ तेलच जळेल. कपडे जसेच्या तसे रहातील. आणि खरोखरच तसे झाले. त्यांच्या बोलण्यानुसार केवळ तेल जळले, कापड जसेच्या तसेच राहिले. ते पाहून सर्वजण अवाक् झाले.
३. दैवी सामर्थ्याने सर्व शास्त्रांमध्ये सर्वज्ञ गुलाबराव महाराज !
त्यांना अंधत्वामुळे कोणत्याही शाळेत जाऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते; परंतु त्यांनी गावातील सुशिक्षित लोकांकडून अनेक धार्मिक ग्रंथ वाचून घेतले आणि आश्चर्य म्हणजे ते सर्व ग्रंथ त्यांचे मुखोद्गत झाले होते. एकदा ऐकल्यावर त्यांनी त्या विषयाचे ज्ञान प्राप्त होत होते. ते वाचून दाखवणार्याला काही ना काही गुरुदक्षिणा स्वरूपात धान्य किंवा द्रव्य देत होते. एकदा तर त्यांनी आपल्या हातातील चांदीचे कडे वाचन करणार्याला दिले होते. संदर्भ ग्रंथांचे महत्त्व जाणण्यासाठी पुस्तकांची पेटी डोक्यावर ठेवून ते बेधडक फिरत होते. फिरण्यासाठी त्यांना कधीही कुणाचे साहाय्य घ्यावे लागले नाही. वेदांपासून योग, भक्ती, संगीत, काव्य, आयुर्वेद, साहित्यशास्त्र, ब्रह्मज्ञान, इतिहास, विज्ञानातील आधुनिक इलेक्ट्रॉन थिअरीपर्यंत त्यांची बुद्धी कधीही कुंठीत होत नव्हती. ज्यांच्याकडून ते या विषयांवरील ग्रंथ वाचून घेत होते, त्यांना सुद्धा या ग्रंथांचे मर्म ते शिकवत होते. कोण कुणाला शिकवत आहे ?, हा प्रश्न वाचकाच्या मनात उभा रहात होता. आपण हे सर्व ज्ञान कसे प्राप्त केले ?, असे विचारल्यावर ते म्हणायचे, भगवान् व्यासांना जसे हे सामर्थ्य होते, तर मला ते भगवत्कृपेने प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोणताही विषय मनात आणताच माझ्या मनःचक्षुसमोर चित्रपटासारखे चित्रित होते.
४. मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना
साधारण वयाच्या १८ वर्षापर्यंत ते माघान या लहानशा खेड्यात राहिले. त्यानंतर अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, रायपूर, इंदूर, काशी, कोलकाता, वृंदावन, जगन्नाथपुरी अशा कितीतरी शहरात जाऊन त्यांनी सनातन वैदिक धर्म आणि कृष्ण-भक्तीचा प्रसार केला. आपल्या भक्तीच्या प्रसार-प्रचारासाठी त्यांनी मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना केली. संत मीराबाई आणि चैतन्य महाप्रभु यांसारख्या महाभागवतांच्या उत्कट ज्ञानोत्तर भक्तीचा मनोहर आविष्कार श्रीमहाराजांच्या रूपाने २० व्या शतकात पहाण्याचे सौभाग्य कितीतरी सज्जनांना प्राप्त झाले. सहस्रो साधक त्यांचे दर्शन आणि मार्गदर्शन घेणे यांसाठी जागोजागी येत होते. लोकनायक बापूजी अणे, साहित्यसम्राट न.चि. केळकर, संतचरित्र लेखक ल.रा. पांगारकर, न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी अशा तत्कालीन महानुभावांनी त्यांच्या सत्संगाचे मोठे रोचक वर्णन केले आहे. विदर्भाचे विख्यात देशभक्त दादासाहेब खापर्डे यांनी त्यांचे प्रवचन ऐकून एक महान आश्चर्य, असे म्हटले होते.
श्री गुलाबराव महाराजांचे शिष्यत्व प्राप्त करण्याचे सौभाग्य ज्या निवडक व्यक्तींना प्राप्त झाले त्यांपैकी काही भक्तांना त्यांनी श्रीकृष्णाची भेट आणि रासक्रीडेचे दर्शन करवले होते. असेच त्यांचे एक भक्त श्री. नारायण पैकाजी पंडित यांनी (जे नंतर त्यांचे उत्तराधिकारी होऊन श्री बाबाजी महाराज या नावाने प्रसिद्ध झाले.) युवावस्थेपासूनच स्वतःचे संपूर्ण जीवन त्यांच्या सेवेत समर्पित केले. त्यांच्या आदर्श सेवाभावाने प्रसन्न होऊन श्रीमहाराजांनी त्यांना स्वतःची संपूूर्ण शक्ती आणि अधिकार दिले.
५. ज्ञानसूर्याचा अस्त
त्यांनी लहानपणापासून अपार कष्ट झेलले. त्यामुळे श्रीमहाराजांची प्रकृती क्षीण झाली होती. तशी त्यांची देहयष्टी पुष्कळ सुंदर आणि सुदृढ होती. धर्मप्रसाराच्या कार्यात जेवणा-खाण्याची किंवा झोपेची त्यांनी कधी पर्वा केली नाही. अंतसमयी ते आपल्या सद्गुरूंच्या (संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या) निकट पुण्यात जाऊन राहिले. सुप्रसिद्ध वैद्य महर्षि अण्णासाहेब पटवर्धन यांनी उपचार केले; परंतु सर्व प्रयत्न असफल झाले. २०.९.१९१५ या दिवशी सूर्योदयाच्या मंगल समयी या ज्ञानसूर्याचा अस्त झाला.
– डॉ. अरविंद स. जोशी, मेहेकर, बुलढाणा.
(साभार : मासिक कल्याण, जुलै २०१६)