रायगडावर ५ आणि ६ एप्रिलला शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम !
अलिबाग, २५ मार्च – छत्रपती शिवाजी महाराज यांची ६ एप्रिलला ३४३ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पर्यटनमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख पाहुणे म्हणून, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.
५ एप्रिलला रायगडावर सायंकाळी ७ वाजता शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर येथे दीपवंदना होईल. रात्री ८.३० वाजता पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती होतील. तसेच रात्री ९.३० वाजता शाहीर किरणसिंग सूरज राऊळ, जळगाव यांचा ही रात्र शाहिरांची हा कार्यक्रम होईल, तसेच रात्री १० वाजता श्री जगदीश्वर मंदिरात हरिजागर होईल.
६ एप्रिलला रायगडावर प्रातःकाळी ५ वाजता श्री जगदीश्वर पूजा, सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव आणि सकाळी ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात येईल.
सकाळी ११ वाजता राजदरबार ते श्री शिवसमाधी अशी श्री शिवप्रतिमेची पालखीतून मिरवणूक होईल, सकाळी ११.३० वाजता रायगड जिल्हा पोलिसांकडून श्री शिवछत्रपतींना मानवंदना आणि दुपारी १२ वाजता शिवभक्तांना होळीचा माळ येथे महाप्रसादाचे वितरण होईल.
तरी छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता या श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे आयोजक, शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमी यांनी केले आहे.
६ एप्रिलला रायगडावर सकाळी ९ वाजता राजदरबार येथे श्री शिवप्रतिमा पूजन होईल, तद्नंतर मराठ्यांच्या समाधीस्थळांचे अभ्यासक श्री. प्रवीण भोसले यांना श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार, तर शूर सरदार हरजीराजे महााडिक यांचे वंशज निवृत्त सैन्यदल अधिकारी (ले. जनरल) सुदर्शन हसबनीस यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यासह गडरोहण स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा, शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन आणि प्रमुख पाहुणे यांचे मनोगत आदी कार्यक्रम होणार आहेत.