लातूर ते नांदेडपर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाविषयी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेणार ! – मुख्यमंत्री
मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – लातूर-नांदेड ब्रॉडगेज रेल्वेमार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर आणि नांदेड यांना रेल्वेमार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाची लांबी ९१.३ कि.मी.असून अंदाजे मूल्य ३ सहस्र १२ कोटी रुपये आहे. लातूर ते नांदेड थेट विद्युतीकरणासह नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पाविषयी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले. या संदर्भात विधानसभा सदस्य तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य राजेश पवार, प्रशांत बंब, बालाजी कल्याणकर, अनिल देशमुख, देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी आणि हे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावेत, या उद्देशाने निवडक रेल्वे प्रकल्पामध्ये प्रकल्प व्ययाच्या ४० ते ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धोरण राज्यशासनाने स्वीकारले आहे. या रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.