खोपोली (रायगड) येथे वाहनफेरीद्वारे ‘हिंदु-राष्ट्र जागृती सभे’ला उपस्थित रहाण्याचे धर्मप्रेमींचे आवाहन !
खोपोली, २४ मार्च (वार्ता.) – लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, वक्फ मंडळाचा लँड जिहाद आदी माध्यमांतून देश आणि हिंदु धर्म यांवर आघात होत आहेत. याविषयी हिंदूंना जागृत करण्यासाठी २६ मार्च या दिवशी खोपोली येथील मुंबई-पुणे जुन्या हायवेवरील श्री समर्थ कृपा हॉटेलच्या शेजारी असलेल्या श्री समर्थ मंगल कार्यालय येथे सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेच्या प्रचारासाठी २४ मार्च या दिवशी धर्मप्रेमींनी वाहनफेरी काढून समस्त हिंदूंना सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. या फेरीत १०० दुचाकीस्वार सहभागी झाले होते.
खोपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून वाहनफेरीला प्रारंभ झाला. ह.भ.प. निकम महाराज यांनी धर्मध्वजाचे पूजन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. श्रीफळ वाढवून वाहनफेरीला प्रारंभ झाला. या फेरीत वेध सह्याद्री, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सह्याद्री प्रतिष्ठान, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वारकरी संप्रदाय, जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदाय, सनातन संस्था आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथील पाटणकर चौक येथे वाहनफेरीची सांगता झाली. भगवे ध्वज घेऊन आणि भगवे फेटे परिधान करून हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. वाहनफेरीच्या शेवटी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनामध्ये समस्त हिंदू बांधवांना सभेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
३५ गावांमध्ये प्रसार !
हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे, यासाठी खोपोली परिसरातील ३५ गावांमध्ये प्रसार करण्यात आला आहे. बैठका, व्याख्याने, हस्तपत्रके, भित्तीपत्रके, फ्लेक्स फलक, फलक लिखाण आदी माध्यमांतून प्रचार चालू आहे. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांसह मान्यवर वक्ते सभेत मार्गदर्शन करणार आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सर्व धर्मप्रेमींना पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, जात-पात बाजूला सारून राष्ट्र आणि धर्म रक्षण यांसाठी ‘हिंदु’ म्हणून सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८०८०२०८९५८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.