पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी उभारली सामूहिक गुढी !
धर्माभिमान्यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !
पुणे – येथील आळंदेवाडी, पारगाव, हडपसर, निरा, केडगाव, मंचर, हिवरेगाव, नारायणपूर, दिवेगाव, डाळिंबगाव, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेक आदी ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी सामूहिक गुढी उभारून गुढीचे पूजन केले, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हिंदु जनजागृती समितीकडून पुणे जिल्ह्यातील २२ हून अधिक शाळा, सोसायटी तसेच मंदिरांमध्ये गुढीपाडवा विषयी प्रवचन घेण्यात आले, तसेच ‘गुढी कशी उभारावी?’ याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन करण्यात आले. ठिकठिकाणी फलक प्रसिद्धीच्या माध्यमातून गुढीपाडव्याविषयी माहिती देण्यात आली. सहस्रो धर्मप्रेमींनी उपक्रमाचा घेतला लाभ !
वैशिष्ट्यपूर्ण
१. आळंदेवाडी तालुका भोर, पुणे येथे धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरासमोर सामूहिक गुढी उभारून प्रार्थना केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. मेघा गोळे उपस्थित होत्या. आळंदेवाडीचे सरपंच श्री. गणेश थोपटे यांचेही सहकार्य लाभले. सामूहिक गुढी उभारण्याची सर्व सिद्धता, प्रसार, सेवा धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी केली.
२. पारगाव सालू मालू येथे धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी स्वतः सर्व नियोजन आणि प्रसार केला अन् हा उपक्रम गावात उत्स्फूर्तपणे घेतला.
३. गराडे गाव, येथे ग्रामसभेत ‘गुढीपाडवा आणि संभाजी महाराजांचे बलीदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने हिंदु राष्ट्राची गुढी उभारण्याचे नियोजन केले. उत्साहात हिंदु राष्ट्राच्या घोषणा दिल्या.
४. निरा धर्मशिक्षणवर्गांतील धर्मप्रेमींनी मोठ्या उत्साहात हिंदु राष्ट्राची गुढी उभारून हिंदूंचे नववर्ष साजरे केले. या वेळी निरा गावचे सरपंच आणि उपसरपंच, तसेच प्रतिष्ठित उपस्थित होते. हिंदु राष्ट्राची शपथ घेऊन सर्वांनी मोठ्या उत्साहाने घोषणा दिल्या.