पुणे येथील पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) यांनी गुरुलीला सत्संगाच्या माध्यमातून साधकांना साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
सौ. मनीषा पाठकताई पुणे जिल्ह्यातील सर्व साधकांसाठी गुरुलीला सत्संग घेते. या सत्संगात तिने केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन पुढे दिले आहे.
१. प्रत्येक कृती करतांना साधना होण्यासाठी करावयाचे प्रयत्न
अ. आपल्याला निर्जीव वस्तूंप्रती कृतज्ञता वाटते का ?, याचा विचार करायला हवा. प्रत्येक वस्तू वापरतांना आपल्यात तसा भाव निर्माण करायला हवा.
आ. छोटीशी कृती करतांनाही गुरुदेवांना आळवावे; कारण आपल्याला अंतर्बाह्य पालटायचे आहे.
२. आनंदी फूल बनण्यासाठी करावयाचे प्रयत्न
२ अ. प्रत्येक परिस्थितीत आनंदी रहाणे : प्रत्येक फूल आनंदी असते. फुलासारखे आनंदी बनून देवाला एकेक नामजप अर्पण करूया. आनंद हा ईश्वराचा गुण आहे-सत्-चित्-आनंद. संकटे आणि अडचणी असतातच; पण आपण आनंदीच राहूया. जेव्हा आपले मन मोकळे असेल, तेव्हा आपल्या चेहर्यावर आनंद दिसतो. समोरचा कसाही असू दे; मला आनंदी रहायचे आहे, असा विचार करूया.
२ आ. प्रत्येकाशी आनंदाने वागणे : प्रार्थना करतांना बालक होऊया. स्वकौतुकाचे विचार, कर्तेपणा, पूर्वग्रहदूषितपणा आणि भूतकाळाचे गाठोडे, हे सर्व सोडले की, आपले मन रिकामे होईल. आनंद हा व्यक्तीसापेक्ष किंवा परिस्थितीसापेक्ष नसतो. समाजातील लोक किंवा साधक कुणीही असू देत; आपण त्यांच्याशी आनंदाने वागूया.
इतरांचे कौतुक करणे, हा मोठा गुण आहे. मला देवाने इतके दिले आहे. आता मला साधकांना आनंद द्यायचा आहे, असा विचार करूया. साधकांशी अनौपचारिक बोलूया. त्यातही अहं नको. आत जे असेल, ते बाहेर येते ना; म्हणून आनंदी राहूया.
२ इ. सेवा आनंदाने करणे : सेवा करतांना गंभीर व्हायला नको. परम पूज्यांना बघा ना ! ते सतत हसत असतात.
२ ई. वर्तमानकाळात रहाणे : आपण सतत रडत असतो, माझे असे झाले. माझे तसे झाले. आपण भूतकाळ आठवून आणि भविष्याविषयी विचार करून दुःखी होतो. त्यापेक्षा वर्तमानात राहून आनंदी राहूया.
२ उ. क्षमायाचना करणे आणि फलकावर किंवा सारणीत चूक लिहिणे, अशा छोट्या छोट्या कृतींतून देवाच्या अनुसंधानातील आनंद घेऊया.
२ ऊ. प.पू. गुरुदेवांनी सगळ्यांना प्रेम आणि आनंद दिला; म्हणून एवढे साधक अन् धर्मप्रेमी जोडले गेले. त्यांच्याप्रमाणे कणभर तरी कृती करूया.
२ ए. गोपी कशा आनंदी होत्या ? भक्त कसे आनंदी होते ? तसे आपल्याला आनंदी बनायचे आहे.
२ ऐ. आता आपण सर्व जण आनंदी फूल बनूया. हार बनून गुरुदेवांच्या हृदयाशी जाऊया.
३. प्रतिमा न जपता मनमोकळेपणाने बोलणे
आपल्याकडून जे प्रयत्न झाले नाहीत, ते मोकळेपणाने सांगून प्रयत्न वाढवूया. मी अशीच आहे, तशीच आहे, अशी प्रतिमा कशाला सांभाळायची ? चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याबद्दल क्षमायाचना करायला हवी; पण वाईट वाटून घ्यायला नको.
– सौ. मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे), पुणे (२९.६.२०२२)
ही सूत्रे पू. (सौ.) मनीषा पाठक संत होण्यापूर्वीची असल्याने लिखाणात त्यांचा उल्लेख पू. असा केलेला नाही.
संग्राहक : सौ. स्नेहल केतन पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २५ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे. (२९.६.२०२२)