सातारा येथील १ सहस्र २८८ शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या !
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण ६ संवर्गातील १ सहस्र २८८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी दिली.
मुजावर पुढे म्हणाल्या, ३ मासांपासून जिल्ह्याच्या अंतर्गत आणि बाहेरील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया चालू आहे. संवर्ग १, २, ३ आणि ४, तसेच विस्थापित अन् अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरून बदली आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यापूर्वी विविध संवर्गातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या आहेत. पती-पत्नी एकत्रिकरण, पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर दोघांपैकी एक जिल्हा परिषद आणि दुसरा राज्यशासनाचा कर्मचारी असेल, तसेच एक जिल्हा परिषद आणि दुसरा केंद्रशासनाचा कर्मचारी असेल, तर अशांना संवर्ग २ मध्ये प्राधान्य देण्यात आले होते. त्यानुसार बदली प्रक्रिया पार पडत आहे.