राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा !
मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादित करतांना विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊनही मागील अनेक वर्षांपासून राज्यातील सहस्रावधी प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी २४ मार्च या दिवशी सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
ते म्हणाले, राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे योगदान नाकारता येणार नाही. प्रकल्पग्रस्त यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे. सरकार यासाठी सकारात्मक आहे. ज्यांचे पुनर्वसन झाले आहे, त्यांना सोयी मिळत आहेत ना ? याचाही आढावा घेतला जाईल. सरकारकडून त्यांना आर्थिक ताकदही देण्यात येईल. प्रकल्पग्रस्तांसाठी सर्वंकष धोरण आणू.