साधकांनो, मनात येणार्या अहंयुक्त विचारांमुळे साधनेत होणारी हानी लक्षात घेऊन ते घालवण्यासाठी अंतर्मुखतेने कठोर प्रयत्न करा !
काही साधकांना वाटते, चांगली साधना करणार्या, तसेच दायित्व घेऊन सेवा करणार्या साधकांशीच उत्तरदायी साधक प्रेमाने आणि सहजतेने बोलतात. ते माझ्याशी बोलत नाहीत. उत्तरदायी साधकांनी प्रेमाने आणि सहजतेने बोलावे, या अपेक्षेची पूर्तता न झाल्याने साधकांवर मनाला नकारात्मकता येणे, पूर्वग्रह निर्माण होऊन मनाचा संघर्ष होणे, बहिर्मुखता वाढणे इत्यादी परिणाम होत असल्याचे लक्षात येते.
साधनेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी अंतर्मुख होऊन उत्तरदायी साधकांचे साहाय्य घेतल्यास आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते. उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून गुरुतत्त्वच आपल्या साधनेसाठी आवश्यक असलेली दिशा देत असते, याची प्रचीती घेण्यासाठी स्वत:हून उत्तरदायी साधकांशी मनमोकळेपणाने बोलणे, तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी स्वतःच्या चुका सांगून त्याविषयी त्यांचे मार्गदर्शन घेणेे आवश्यक आहे. अध्यात्मात व्यक्तीला महत्त्व नाही, तर त्या माध्यमातून कार्य करणार्या ईश्वराची अनुभूती घेण्याला महत्त्व आहे.
साधकांच्या मनात वरील प्रकारचे अपेक्षेचे विचार वारंवार येत असल्यास त्यांनी त्याविषयी स्वयंसूचना देऊन कृतीच्या आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करावेत.
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२३)