हिंदु धर्माचे सौंदर्य आणि कलेचे साकार रूप म्हणजे उद्याने !
मोगल गार्डन नव्हे अमृत गार्डन !
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनाच्या आवारातील मोगल गार्डन या नावाने ओळखल्या जाणार्या उद्यानाचे नाव पालटून अमृत उद्यान असे करण्यात आले. या नामांतरामुळे काही लोकांना अत्यानंद झाला, तर सेक्युलरवाद्यांना (निधर्मीवाद्यांना) त्यांच्या प्रिय मोगल इतिहासाची साक्ष असणार्या या बागेचे नाव पालटल्यामुळे पुष्कळ निराशा आली. हे तेच लोक आहेत, जे उझबेकिस्तानमधील आक्रमकांवर टिका केल्यावर सर्वाधिक दु:खी होतात.
यातील वादाचे सूत्र असे होते की, या लोकांच्या मते भारतातील मूळ रहिवाशांकडे अशा प्रकारची उद्याने निर्माण करण्याची क्षमताच नव्हती आणि त्यामुळे सर्वप्रथम मोगलांनीच भारतात चार बाग या नावाने ओळखली जाणारी उद्याने निर्माण केली. मंगोल आणि तुर्क लोकांच्या वंशसंकराने मोगल ही जमात अस्तित्वात आली. मोगलांवर पर्शियन संस्कृतीचा पुष्कळ प्रभाव होता, त्यामुळे भारतावर राज्य करणार्या प्रत्येक सुलतानाची येथे हुबेहुब पर्शिया निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा होती. त्या दृष्टीने या कथित सुसंस्कृत लोकांवर असंस्कृत भारतियांना सुसंस्कृत करण्याचे ओझे होते आणि धर्मनिरपेक्ष लोकांचा याच विधानावर पूर्ण विश्वास आहे.
१. निधर्मीवादी ७ सहस्र वर्षांपूर्वी वसवलेल्या हडप्पा शहराविषयी काही बोलतील का ?
चार बाग ही उद्याने शून्यातून उभी करण्यात आली नव्हती. इस्लामपूर्व काळात अशा प्रकारची उद्याने पर्शियात होती, असे संदर्भ उपलब्ध आहेत. असे असले, तरी चार बाग ही काही विलक्षण गोष्ट नाही; कारण दोन मार्ग अथवा कालवे यांंच्या साहाय्याने संपूर्ण उद्यानाचे ४ भागात विभाजन केले जात असल्याने त्याला चार बाग असे संबोधले जाते. जर ४ भागांत विभाजन केल्या गेलेल्या एका उद्यानाची इतकी प्रशंसा होते, तर या ठिकाणी ७ सहस्र वर्षांपूर्वी आम्ही अत्यंत सुनियोजित आराखड्यावर आधारित हडप्पा शहर वसवले होते, हे लक्षात घ्यायला हवे.
२. चार बागांच्या उगमाविषयीचा कथित इतिहास आणि इस्लामने दिलेली मान्यता
इतिहासात पर्शियाचा राजा सायरस द ग्रेट (ख्रिस्तपूर्व ५५९-५३०) याच्या तेथील राजवाड्यात अशा स्वरूपाचे एक राजउद्यान होते, जे जलप्रवाहाने ४ भागांत विभागले होते. उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या एका इमारतीमध्ये एक मोठा सज्जा होता. येथूनच राजपरिवाराच्या सदस्यांना संपूर्ण उद्यानाचे विस्तृत दृश्य दिसत असे. इस्लामच्या संस्थापकांना उद्यानाचा हा आराखडा पुष्कळ आवडल्याने त्यांनी तो मनापासून स्वीकारला आणि त्याचा संदर्भ त्यांनी त्यांच्या धार्मिक ग्रंथातही लिहून ठेवला. अरेबिया हा वाळवंटी प्रदेश असल्याने तेथील लोकांना पाणी, झाडे आणि थंड वातावरण यांचे आकर्षण होतेच. त्यामुळे त्यांनी याच गोष्टींना स्वर्गातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणून स्थान दिले. इस्लामच्या राजवटीत अशी उद्याने श्रीमंत लोकांची खासगी मालमत्ता असत आणि तेथे सामान्य लोकांना प्रवेश दिला जात नसे. उच्चकुलीन मुसलमान योद्धे पाशवी नरसंहार करून परत आल्यावर याच उद्यानात विश्रांती घेत असत.
३. परकियांच्या अस्तित्वाच्या खुणांचे जतन, तर हिंदूंच्या अतीप्राचीन मंदिरांकडे अक्षम्य दुर्लक्ष !
मध्ययुगीन काळात मुसलमान आक्रमकांनी आशिया आणि आफ्रिका खंडात घुसखोरी करून पुष्कळ प्रदेश कह्यात घेतले होते. स्वतःच्या राजकीय आणि लष्करी वर्चस्वाचे प्रतीक म्हणून या आक्रमकांनी या प्रदेशांमध्ये अशा उद्यानांची निर्मिती केली. मोगलांनी देहली, आगरा, काश्मीर येथे अनेक ४ बागांची निर्मिती केली. ही उद्याने अजूनही चांगल्या स्थितीत आहेत; मात्र मुसलमानबहुल राष्ट्रांत अशा उद्यानांचे अस्तित्व उरलेले नाही. हे असे का आहे ?, याचा विचार करता निधर्मीवादाचा अंगीकार केलेल्या भारत सरकारने परकीय आक्रमकांच्या अस्तित्वाच्या या खुणा जपून ठेवलेल्या आहेत आणि त्या नाश पावणार नाहीत, याची पूर्णतः काळजी घेतली आहे; मात्र याउलट ५ शतकांपूर्वीची हिंदु मंदिरे आजही भग्नावस्थेत आहेत आणि नष्ट होत आहेत. इतिहासाचे संवर्धन म्हणूनही या मंदिरांची दुरुस्ती करण्याचा विचार सरकारच्या मनात येत नाही. याचे प्रमुख उदाहरण म्हणून काश्मीर येथील सूर्य मंदिराकडे पहाता येईल. भारतातील सहस्रो मंदिरे याच दुःस्थितीत आहेत.
४. चार बाग उद्यानांची मूळ संकल्पना भारतीयच !
चार बाग उद्यानांच्या मूळ संकल्पनेचा जन्म पर्शिया, मध्य आशिया किंवा अरेबिया येथे झालेला नसून तो भारतात झाला आहे. जेव्हा वर्ष १५५८ मध्ये देहली येथे हुमायूची कबर स्मारक स्वरूपात बांधण्यात आली, तेव्हा तेथे अशा उद्यानाची निर्मिती करण्यात आली. भारतियांकडे धन, स्थापत्यशास्त्रातील कौशल्य आणि व्यवस्थापन कुशलता असल्यामुळे अनुमाने १ सहस्र ५०० वर्षांपासून ते भारत आणि दक्षिण मध्य आशिया येथे भव्य मंदिरांची निर्मिती करत आहेत. वर्ष १५९८-१६२९ च्या काळात पर्शियामध्ये इसफहान येथे नक्ष-ए-जहान या उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. वर्ष १५२८ मध्ये बाबराने अशा स्वरूपाचे एक उद्यान काबूल येथे आणि त्यानंतर ढोलपूर (राजस्थान) येथे निर्माण केले.
५. प्राचीन ग्रंथांमध्ये उद्यानांविषयी असलेली माहिती
चार बाग या उद्यान संकल्पनेला नेहरूप्रणित इतिहासाने अगदी वेगळेच वळण दिले. या इतिहासात हिंदू हे बेघर आणि निर्वस्त्र अवस्थेत वाळवंटात रहात होते आणि त्यांनी कधीही झाडे पाहिली नव्हती, असे गृहित धरले होते. भारत वनांचा प्रदेश आहे, हे सत्य येथे नाकारण्यात आले होते. कामसूत्र, महाभारत, ऋग्वेद, रामायण या पवित्र ग्रंथात वनांचे संदर्भ आहेत. इतिहासकारांनी श्रीकृष्ण आणि गोपी यांची लीला जेथे रंगली, त्या वन-उपवनाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. कित्येक नैसर्गिक आणि मानवनिर्मित उद्यानांमध्ये होळी, वसंतोत्सव आणि दिवाळी यांसारखे सण साजरे केले जात. प्राचीन हिंदु उद्यानांचे उद्यान, परमदोवन, वृक्षवाटिका, नंदनवन असे ४ प्रकार होते. उद्यानात राजे-महाराजे बुद्धीबळ खेळत आणि नर्तिका अन् विदूषक त्यांची करमणूक करत असत. उद्यानात राजदांपत्य विहार करत असे. वृक्षवाटिकेची निर्मिती राजे स्वतःच्या उच्च पदस्थ सरदारांसाठी करत असत. काही उद्याने केवळ श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी म्हणून निर्माण केली जात असत. सावलीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लावण्याचीही पद्धत होती, ज्याला मार्गेषु वृक्ष असे म्हटले जात असे.
६. बौद्ध वाड्मयातही उद्यानांच्या निर्मितीचा संदर्भ आढळणे
बौद्ध वाड्मयात राजा बिबिंसार याने गौतम बुद्धाला बांबूचे वन दिल्याचा, तसेच दिघनिकाय या बौद्ध साहित्यात बुद्धाचा जिवक मठातील आंब्याच्या बागेत वास्तव्य असल्याचा उल्लेख आहे, जी त्याला जिवक नावाच्या वैद्याने दिली होती. बुद्धाच्या काळात वैशाली हे नगर उद्यान आणि वन यांनी समृद्ध होते, असा संदर्भ ललित विस्तारा या ग्रंथात आढळतो. सम्राट अशोकाच्या काळातील शिलालेखांमधून औषधी वनस्पती आणि वेली यांसाठी विशेष उद्याने निर्माण केल्याचा उल्लेख आहे. त्या उद्यानांत जलाशय, सुनियोजित आराखडे आणि विश्रांती घेण्यासाठी मंडपही असत.
७. कामसूत्र ग्रंथ आणि चिनी प्रवासी झुआनझँग याच्या साहित्यात उद्यानांविषयी असलेले वर्णन
कामसूत्र या ग्रंथात परसबाग, भाज्या आणि ऊस लागवड, तसेच जाई अन् गुलाब यांसारखी सुगंधी फुले लावण्याविषयी, तसेच बागेत बसण्यासाठी आसने, लताकुंज बनवण्याविषयी मार्गदर्शन आहे. बागेच्या मध्यभागी पाण्यासाठी विहीर अथवा तलाव असावा, असे उल्लेख आहेत. समकालीन साहित्यांत जलाशयांच्या आसपास कमळाच्या आकाराची स्नानगृहे आणि बैठका, तलाव, झोपाळे, मार्गांवर असलेली उद्याने, तसेच प्राणीसंग्रहालये असल्याचे संदर्भ सापडतात. चिनी प्रवासी झुआनझँग याने नालंदा नगराचे वर्णन करतांना बौद्ध विहारांच्या आसपास निळ्या रंगाची कमळे ज्यात बहरलेली आहेत, असे तलाव असून त्यावरून येणारा वारा वातावरण शीतल करतो, तसेच सुंदर कनकाची चमकदार लाल फुले सर्वत्र सदा बहरलेली असतात. विहारांच्या बाहेर असलेल्या आंब्याच्या बागा तेथील निवासी लोकांना दाट आणि संरक्षक सावली देतात, असे वर्णन केले आहे.
८. संत कालिदास आणि हिंदूंचे विविध ग्रंथ यांमध्ये उद्यानाविषयी असलेले संदर्भ
इतर अनेक गोष्टींप्रमाणे हिंदूंनी उद्याने बांधण्यासाठी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. संत कालिदासांसारख्या महाकवींनी त्यांच्या कवितांमध्ये निर्जन बागेत प्रेमीयुगुलांच्या भेटीचे श्रृंगारिक वर्णन केले आहे. १६ व्या शतकातील शिल्परत्न या हिंदू साहित्यामध्ये पुष्पवाटिका नगराच्या उत्तर दिशेला असावी, असा उल्लेख आहे. संत कालिदासांच्या मते उद्यानात तलाव, लतामंडप, कृत्रिम लहान टेकड्या, झोपाळे, सावली देणार्या मोठ्या वृक्षांखाली बसायला आसने किंवा कट्टा असायला हवा. काही पुरातन चित्रकला आणि शिल्पकला यांत महिलांना सलाभंजिका म्हणजे सला नावाची फुले तोडून आनंदी होणार्या, असे म्हटले गेले आहे. अर्थशास्त्र, शुक्रनीती, कमंदकांती यांसारख्या ग्रंथांत लोक १ दिवसाच्या सहलीसाठी जाऊ शकतील, अशा सार्वजनिक उद्यानांची शासनाने निर्मिती नगराबाहेर करावी, असे सूत्र आढळून येते. १४ व्या शतकातील विश्वकोष शारंगधरा-पद्धतीमधील उपवन विनोद नावाच्या अध्यायात फलोत्पादन आणि बागकाम यांविषयी माहिती आढळते.
९. हिंदूंना मानवनिर्मित निसर्गाच्याऐवजी त्याचे मूळ रूप अधिक प्रिय !
भारतीय उपखंडाचा एक भाग असलेल्या श्रीलंकेतील सिगिरिया येथे प्राचीन काळातील चौकोनी मंडल असलेल्या उद्यानांचे आराखडे सापडले आहेत. हेच चार बाग उद्यानांचे मूळ स्वरूप असावे. याखेरीज हिंदूंना आणि तत्सम संप्रदायांतील लोकांना वने, पर्वत, नद्या अन् गुहा यांचे नेहमीच आकर्षण असून त्यातून ते आनंद घेतात. त्यामुळे बहुतांश मंदिरे आणि आश्रम हे नद्या, समुद्र अन् खोरी यांच्या नजीक, तसेच पर्वतांच्या शिखरांवर बांधली आहेत. हिंदूंना मानवनिर्मित निसर्गाच्या ऐवजी निसर्गाचे मूळ रूप अधिक प्रिय आहे. हेच हिंदु धर्माचे सौंदर्य आहे. केवळ याच वैशिष्ट्यामुळे सुव्यवस्था आणि अनागोंदी यांच्यातील अनादि कलहातूनही सहस्रो वर्षे अनेक आक्रमणे होऊनही हिंदु धर्म टिकून आहे.
– श्री. अमित अग्रवाल, नवी देहली (२०.२.२०२३)
|