वाचकांचे अभिप्राय
सनातनची घरोघरी लागवड मोहीम : लेखांक १००
१. अनेक वाचकांनी लेखमाला आवडत असल्याविषयी कळवले, तसेच अनेकांनी आम्ही व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर आणि फेसबुक पानावर हे लेख ठेवतो, असेही कळवले. या प्रतिसादामुळेच लिखाणातील सातत्य आणि उत्साह टिकून रहाण्यास साहाय्य झाले.
२. अनेक साधक आणि वाचक यांनी भाजीपाला अन् औषधी वनस्पती यांची लागवड करण्यास आरंभ केला, तसेच नियमितपणे जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले एक मिश्रण) सिद्ध करून ते झाडांना देणे चालू केले. याविषयीचे अनुभवही काही जणांनी लिहून पाठवले आहेत. हे अनुभव सध्या प्रत्येक शुक्रवारी दैनिक सनातन प्रभातमधून प्रसिद्ध करत आहोत.
३. एका वयस्कर साधकांनी सांगितले, मला झाडांची पुष्कळ आवड आहे; परंतु वयोमानानुसार आता लागवड करणे शक्य नाही. त्यामुळे ही लेखमाला वाचून मी तो आनंद अनुभवतो.
भावी आपत्काळाची पूर्वसिद्धता करण्यासाठी भगवंताने आपल्याला हे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे, हा भाव मनात ठेवून या नववर्षाच्या निमित्ताने आपण काही प्रमाणात तरी लागवड शिकून घेण्याचा निश्चय करूया. स्वतःच्या कुटुंबासाठी न्यूनतम एक तरी भाजी या मासात पिकवण्याचे ध्येय ठेवूया.
घरच्या घरी लागवड करणे सोपे व्हावे, यासाठी हे सर्व लिखाण एकत्रितपणे ग्रंथरूपाने लवकरच प्रकाशित करण्यात येईल. या शंभराव्या भागानंतर नियमित लेखमालिका आम्ही इथे थांबवत आहोत. असे असले, तरी प्रासंगिक लेखांच्या माध्यमातून आपली भेट होतच राहील. ही लेखमालिका वाचून तुम्ही काय प्रयत्न केले ?, ते आम्हाला कळवावे. तुमच्या प्रयत्नांतून इतरांनाही शिकता येईल, तसेच लागवडीविषयीच्या शंका किंवा अडचणीसुद्धा कळवाव्यात. या प्रश्नांची उत्तरेही सनातन प्रभातमधून प्रसिद्ध केली जातील. (समाप्त)
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१४.३.२०२३)
लेखांकांची शतकपूर्तीसनातनच्या घरोघरी लागवड मोहिमेला आरंभ झाल्यानंतर लागवड करतांना वाचकांना साहाय्य व्हावे, यासाठी चालू केलेल्या या लेखमालेचा १०० वा भाग आज प्रकाशित होत आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा आणि वाचकांचे प्रेम यांमुळेच हे १०० लेखांक पूर्ण होऊ शकले, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. लागवडीविषयीचे अनुभव आणि शंका पुढील ई-मेलवर पाठवाव्यात |