महावितरणकडून पुणे येथील ४० सहस्रांहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित !
पुणे – पुणे परिमंडलातील ६ लाख ६ सहस्र ५६८ घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे मिळून १३२ कोटी ८९ लाख रुपयांच्या वीजदेयकांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही वीजदेयकांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने चालू करण्यात आली आहे. गेल्या दीड मासाच्या कालावधीत पुणे परिमंडलातील ४० सहस्र ९१५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्रोत प्रामुख्याने वीजदेयकांची वसुली हाच आहे. वीज खरेदी, दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती व्यय, कर्जाचे हप्ते, कंत्राटदारांची देणी हा सर्व व्यय वीजदेयक वसुलीवरच अवलंबून आहे; मात्र वीजदेयकांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणकडून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याच्या कटू कारवाईला वेग देण्यात आला आहे. देयकाची रक्कम किती आहे, हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई चालू आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजदेयकांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी रहातेच कशी ? याच्या मुळाशीही जायला हवे. तरच ही समस्या पुन्हा निर्माण होणार नाही ! |