सततच्या सर्दीवर सोपा उपाय
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १६८
१. सततच्या सर्दीचे एक कारण
‘अनेकांना सकाळी उठल्या उठल्या नाक चोंदणे, भरपूर शिंका येणे, नाक वहाणे इत्यादी त्रास होतात. आपल्या नाकाच्या भोवताली कवटीच्या हाडामध्ये पोकळ्या असतात. या पोकळ्यांना ‘पॅरानेझल सायनसिस्’ असे म्हणतात. रात्री आपण झोपलेलो असतो त्या वेळी या पोकळ्यांमध्ये स्राव जमा होऊन थबकून रहातो. यामुळे या पोकळ्या चोंदतात आणि सकाळी उठल्यावर चोंदलेले स्राव मोकळा होण्यासाठी शिंका येऊ लागतात.
२. उपचार
२ अ. शुंठी (सुंठ) चूर्ण : हा त्रास न्यून होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चहाचा पाव चमचा ‘सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण’ अर्धी वाटी कोमट पाण्यात मिसळून प्यावे. यामुळे अधिक प्रमाणात स्राव साठणे न्यून होते.
२ आ. चेहरा शेकणे : सकाळी उठल्यावर चेहरा गरम कपड्याने शेकावा. यामुळे नाकाच्या भोवतालच्या पोकळ्यांतील स्राव पातळ होण्यास साहाय्य होते.
२ इ. शीर्षासन : यानंतर सर्वांत महत्त्वाचा उपाय म्हणजे ‘शीर्षासन’ करणे. शीर्षासन म्हणजे ‘खाली डोके वर पाय’ या स्थितीमध्ये थांबणे. (हे ज्यांना जमते त्यांनीच करावे किंवा तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शिकून मग करावे. चुकीच्या पद्धतीने शीर्षासन केल्याने त्रास होऊ शकतो.) असे साधारण ३० सेकंद केल्याने नाकाच्या भोवतालच्या पोकळ्यांमधील स्राव सहजपणे बाहेर पडून निघून जातात. साधारण ७ – ८ दिवस असे नियमित केल्याने नाकाभोवतालच्या पोकळ्यांमध्ये स्राव साठण्याची प्रवृत्ती नाहीशी होते.
२ इ १. शीर्षासनाला पर्याय : ज्यांना शीर्षासन जमत नाही, त्यांनी सूर्यनमस्कारातील स्थिती क्रमांक २ किंवा ७ (चित्र पहा) मध्ये साधारण ३० सेकंद थांबावे.
शीर्षासन केल्यावर किंवा डोके उलटे करून थांबल्यावर आरंभी १ – २ दिवस शिंकांचे प्रमाण वाढते; परंतु नंतर ते अल्प होत जाऊन शिंका येणे बंद होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२३)
♦ या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या ♦ |