जॉर्ज सोरोस : भारतियांमध्ये असंतोष पेरणारा खलनायक !
१२५ वर्षांपूर्वी भारतीय जनतेच्या मनात ब्रिटिशांविषयी असंतोष निर्माण करून स्वातंत्र्याची आस जागवणार्या लोकमान्य टिळक यांना ब्रिटीश अधिकारी ‘भारतीय असंतोषाचा जनक’ म्हणत. आज भारतियांच्या मनात असंतोष निर्माण करून देशाच्या स्वातंत्र्याला सुरूंग लावण्याचे काम एक विघ्नसंतोषी व्यक्ती करत आहे. तिचे नाव आहे जॉर्ज सोरोस ! भारतियांमध्ये असंतोष पेरणार्या या खलनायकापासून सावध रहाण्याची आज आवश्यकता आहे.
१. राष्ट्रवाद नाकारणारी ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’
‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ नावाची आंतरराष्ट्रीय संस्था तिच्या आदर्शवादी मुखवट्याच्या आडून चाललेल्या संशयास्पद कामांमुळे आणि त्या संस्थेचे संस्थापक कोट्यधीश जॉर्ज सोरोस हे त्यांच्या विचारसरणीमुळे, तिरकस अन् विवाद्य शेरेबाजीमुळे जगप्रसिद्ध आहेत. ‘राष्ट्रवाद’ या संकल्पनेला नाकारणारी ही संस्था मानवाधिकार, राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य, संवादी लोकशाही राज्यव्यवस्था या पायाभूत मूल्यांवर आधारलेली असल्याचे म्हटले जाते.
मूळचे हंगेरियन असलेल्या जॉर्ज सोरोस यांचा जन्म बुडापेस्ट शहरात एका ज्यू कुटुंबात झाला. तेव्हा नाझी अत्याचारांपासून जीव वाचवण्यासाठी सोरोस यांच्या वडिलांनी ज्यू ही ओळख लपवली आणि ख्रिस्ती असल्याचे भासवले. त्या वेळी १३ वर्षांच्या असलेल्या किशोरवयीन सोरोसने अनेक ज्यू बांधवांना अत्याचारी नाझींपर्यंत पोचवले. नाझी अत्याचारांचा अनुभव घेतल्याने राष्ट्रवाद म्हणजे नाझीवाद, ‘फॅसिझम’कडे (हुकूमशाहीकडे) झुकणारी विचारसरणी असा सोरोस यांचा दृढ समज झाला असावा; म्हणूनच ‘राष्ट्र-राज्य या संकल्पनेला नाकारत वैश्विक मानवी समाज, खुला समाज उभा करण्याचे ध्येय’, ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’ ही संस्था बाळगते. राष्ट्रवाद नाकारणे, हे अनाकलनीय आणि अव्यवहार्य आहे. कोणतीही व्यक्ती ही आधी एका राष्ट्राची घटक असते आणि मगच ती जगाची नागरिक असू शकते. व्यक्ती ते जग यांमधील हा महत्त्वाचा दुवा नाकारून वैश्विक समाज उभा करायचा, हा प्रयत्न प्रत्यक्षात येणेही अशक्य आहे.
२. भारतीय आणि युरोप-अमेरिका येथील राष्ट्रवादामधील भेद
युरोप-अमेरिकेतील वाढत्या राष्ट्रवादाला विरोध करणे आणि भारतीय राष्ट्रवादावर आक्षेप घेणे म्हणजे मुळात या दोन्हीतील भेद समजून न घेणे होय. युरोप-अमेरिकेत वाढत्या मुसलमान कट्टरतावादाला विरोध म्हणून तिथे राष्ट्रवादी विचारसरणी वाढत चालल्याचे दिसते; मात्र हा प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद आहे. भारताचे तसे नाही. ‘राष्ट्रवाद’ ही संकल्पना हा येथील स्वाभाविक मूलाधार आहे. तो बाहेरून आयात केलेला वा प्रतिक्रिया म्हणून समोर आलेला विचार नाही. भारतात वेदकाळापासून या संकल्पनेचा विचार केलेला दिसतो. त्याचे ग्रांथिक दाखले काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सापडतात. काळाबरोबर विकसित झालेली अशी ही खास भारतीय संकल्पना आहे आणि तिचा स्पष्ट उच्चार अन् आग्रहपूर्वक आचरण करणारे सध्याचे सरकार आहे.
मात्र ही वैचारिक परंपरा समजून घेण्यात ना सोरोस यांना रस आहे, ना त्यांच्या संस्थेला; म्हणूनच तर मोदी आणि ट्रंप यांची तुलना करण्यात त्यांना काही वावगे वाटत नाही. त्यामुळे ट्रंपविरोधात सोरोस महाशयांनी जे कारनामे केले, तोच प्रयत्न मोदी यांच्याविषयीही वेगवेगळे मुद्दे पुढे करत ते ठराविक कालावधीनंतर करतांना दिसत आहेत.
३. सोरोस यांचा वैचारिक गोंधळ कि जाणीवपूर्वक चाललेली दिशाभूल ?
२ वर्षांपूर्वी दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत कोट्यधीश सोरोस यांनी भारतातील ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’वर ‘भारताची सर्वांत मोठी आणि भीतीदायक पीछेहाट झाली आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेले नरेंद्र मोदी हिंदु राष्ट्रवादी सरकार स्थापन करायला निघाले आहेत’, अशा शब्दांत तिरकस शेरेबाजी केली. यामागे भारतीय राष्ट्रवादाविषयीची अनभिज्ञता तर आहेच, त्यासह जगातील धनदांडग्या व्यक्तीने मुसलमानांचे केलेले लांगूलचालन आणि त्यांच्या आंदोलनाला पुरवलेले बळ असाही त्याचा अर्थ आहे. ज्या ओपन सोसायटी फाऊंडेशनचा जगभर गवगवा आहे, ती संस्था अनेक देशांमध्ये पैशाच्या बळावर समाजात अस्वस्थता निर्माण करते. मंगोलिया, इंडोनेशिया, म्यानमार, पाकिस्तान येथे तिच्या शाखा आहेत. म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या बाजूने असलेली संघटना चिनी नेतृत्वाच्या विरोधात तेथील विद्यार्थ्यांना निदर्शनासाठी बळ पुरवते. या दोन उदाहरणांवरून फाऊंडेशनची मूलभूत तत्त्वे आणि कृती यांतील परस्पर विसंगती लक्षात यावी. ‘हा वैचारिक गोंधळ आहे कि जाणीवपूर्वक चाललेली दिशाभूल ?’, हा प्रश्न आहे.
४. सोरोस आणि ओपन सोसायटी फाऊंडेशन बजावत असलेली भूमिका
सोरोस जगातील सर्वांत श्रीमंतांच्या सूचीत पहिल्या दहांमध्ये नसतीलही; मात्र अनेक देशांचे प्रमुख ठरवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा जॉर्ज बुश (ज्युनियर) निवडून येऊ नयेत; म्हणून सोरोस यांनी निवडणुकीत प्रचंड पैसा ओतला होता, हा ज्ञात इतिहास आहे. त्यांनी ओपन सोसायटी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध स्वयंसेवी संस्थांना कोट्यवधींचे भरघोस आर्थिक आणि प्रसारमाध्यमांतील विविध संस्था-संघटनांच्या उभारणीसाठी साहाय्य केले आहे. यामुळेच ‘आपल्या मताने जग पालटावे’, अशी त्यांची अपेक्षा असते आणि ती वेळोवेळी दिसूनही येते.
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोरोस यांनी केलेली टीका अन् परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सोरोस यांना दिलेली समज
जगात लोकशाही नांदावी, यासाठी प्रयत्न करणारे (?) सोरोस भारतात लोकशाही मार्गाने आणि बहुमताने निवडून आलेल्या नरेंद्र मोदींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ‘भारत हा लोकशाही देश आहे; मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते नाहीत. ते मुसलमानांच्या विरोधात हिंसा भडकवण्याचे काम करत असून त्यामुळेच त्यांची प्रगती झाली’, अशी शेरेबाजी त्यांनी जर्मनीत झालेल्या ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’मध्ये केली. २ वर्षांपूर्वी भारतात आलेल्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ने त्यांना होत असलेला त्रास तर यामागे आहेच; मात्र त्यासह वर्ष २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही मोर्चेबांधणी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच परिषदेत त्यांनी अदानी प्रकरणावरही वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘‘नरेंद्र मोदी गप्प आहेत; मात्र परदेशी गुंतवणूकदारांना त्यांना उत्तर द्यावे लागेल. यामुळे मोदींची भारताच्या राजकारणावरची पकड ढिली झाली आहे आणि पुढच्या काळात भारतात आवश्यक असणार्या मुक्त वातावरणासाठी दारे खुली होणार आहेत. भारतात लोकशाही मूल्ये प्रस्थापित होण्याची आवश्यकता आहे.’’ ‘जो देश जगातील ‘सर्वांत मोठा लोकशाही’ असलेला आहे आणि ज्या देशाची अर्थव्यवस्था गेल्या ८ वर्षांत जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे, आंतरराष्ट्रीय नाणे निधीसारखी संस्थाही ज्या देशाच्या आर्थिक प्रगतीची प्रशंसा करते, त्या देशाच्या योगक्षेमाची काळजी सोरोस यांनी करण्याची अजिबात आवश्यकता नाही’, अशी स्पष्ट समज परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सोरोस यांना आणि त्यांची री ओढणार्या अनेक भारतियांना ही चेतावणी आहे.
६. आंतरराष्ट्रीय कट
‘अदानी प्रकरण हे देशावर केलेले आक्रमण आहे. वर्ष २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेला आंतरराष्ट्रीय कट आहे’, असे मानणारा एक मोठा गट आहे. सोरोस यांच्या भारतविरोधी वक्तव्यांचा विचार या संदर्भात केला, तर हा संशय अधिक दृढ होतो.
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, २३.२.२०२३)