राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शेतकर्यांची फसवणुकीची तक्रार !
कोल्हापूर – सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासद आणि समभाग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार २५ शेतकर्यांनी कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे केली आहे. या अगोदर मुरगूड पोलीस ठाण्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागलचे विवेक कुलकर्णी आणि इतर शेतकर्यांनी तक्रार नोंद केली आहे.
या संदर्भात आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमदार हसन मुश्रीफ यांनी उभारलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लि. बेलेवाडी या कारखान्याचे सभासद होण्यासाठी आम्ही प्रत्येकी १० सहस्र रुपये दिले आहेत. आम्हाला नुकतेच समजले की, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आमदार हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबातील लोकांचा आणि काही एल्.एल्.पी. आस्थापनाच्या मालकीचा आहे. यामध्ये अन्य कुणीही सभासद केलेले नाही. त्यामुळे ही आमची फसवणूक असून याविषयी आमचाही सविस्तर जबाब नोंदवून घेण्यात यावा.