मिरज येथून दत्त भक्तांसाठी आंध्रप्रदेशात जाण्यासाठी, तसेच अन्य गाड्या चालू करण्याची प्रवाशांची मागणी !

संग्रहित चित्र

मिरज – कोरोनानंतर कोल्हापूर, तसेच मिरज येथून धावणार्‍या अनेक गाड्या बंद करण्यात आल्या असून मध्य रेल्वेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कोल्हापूर येथून मुंबई येथे जाण्यासाठी रात्रीची ‘सह्याद्री एक्सप्रेस’ ही गाडी गेली २ वर्षे बंद आहे, तसेच मिरज येथून आंध्रप्रदेशात जाणार्‍या दत्तभक्तांना पिठापूर येथे जाण्यासाठी गाडी सोडण्याची मागणी दीर्घकाळ होत आहे. कोल्हापूर येथे सद्यःस्थितीत फलाट वाढवण्यासाठी जागा नसून मिरज येथेही ६ फलाट अपुरे पडत आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देतांना सांगलीचे श्री. रोहित इंगळे म्हणाले, ‘‘या संदर्भात रेल्वेच्या पुणे विभागाशी पत्रव्यवहार केला असता सातत्याने विविध कारणे सांगितली जातात. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने मिरज-विशाखापट्टणम् रेल्वे चालू होऊ शकत नाही, असे सांगितले जाते. कोल्हापूर आणि मिरज येथील रेल्वेस्थानकांची अपुरी जागा पहाता भव्य आणि स्वतंत्र असे नवीन ‘रेल्वे टर्मिनस’ मालगाव येथे सिद्ध होऊ शकते. मालगाव अनेक हेक्टर पडीक भूमी असून तेथे ‘रेल्वे टर्मिनस’ झाल्यास अनेक समस्या सुटू शकतील. ज्याप्रमाणे रेल्वेचा पुणे विभाग स्वतंत्र आहे, त्याप्रमाणे मिरज हा स्वतंत्र विभाग झाल्यास अनेक अडचणी सुटू शकतील.

कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाच्या अंदाजपत्रकास संमती मिळाली आहे; मात्र याचे काम अद्याप चालू नाही. मिरज कर्नाटकातील विजयपूरला जोडण्यासाठी मिरज शेड्याळ-अथणी-विजयपूर या मार्गास संमती देण्यात आली; मात्र पुढे त्याचे काहीच झाले नाही. याकडेही लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.’’