शारीरिक त्रासातही झोकून देऊन सेवा करणार्या आणि साधकांना घडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणार्या पुणे येथील पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !
पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) या १४ मार्च २०२३ या दिवशी १२३ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यानिमित्त पुणे येथील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. राजश्री धांडे, औंध, पुणे.
१ अ. कृतज्ञताभाव : ‘शारीरिक त्रास असतांनाही गुरुदेवांनी मला जिवंत ठेवले आहे आणि गुरुदेव सेवेची संधी देत आहेत’, याबद्दल मनीषाताईंना पुष्कळ कृतज्ञता वाटते.’
२. सौ. वंदना संकपाळ (वय ६५ वर्षे), चिंचवड, पुणे.
अ. ‘मनीषाताईची शारीरिक स्थिती आणि ती झोकून देऊन करत असलेली सेवा पाहून मला माझ्या दुखण्यावर मात करता येते. माझा उत्साह वाढून मला प्रोत्साहन मिळते.’
३. प्रा. विठ्ठल जाधव, भोर, पुणे.
३ अ. ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असा ध्यास असणे : ‘साधकांनी व्यष्टी साधना करावी’, यासाठी ताई प्रयत्नरत असते. ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी’, याचा ताईला असलेला ध्यास मागील वर्षापासून पुष्कळ वाढला आहे. साधनेच्या प्रयत्नांत एखादा साधक न्यून पडत असल्यास ताई त्याच्या अडचणी जाणून घेते आणि उपाययोजनाही सांगते. ताईमधील प्रेमभावामुळे ‘ती कुटुंबातील एक सदस्यच आहे’, असे मला वाटते.’
४. सौ. राधिका घागरे, चिंचवड, पुणे.
अ. ‘ताईकडे अनेक सेवा असूनही ती ‘समष्टीतील प्रत्येक सूत्र माझे दायित्व आहे’, या जाणिवेने पूर्ण करते.’
५. सौ. प्रतिभा फलफले, सातारा रस्ता, पुणे.
५ अ. ‘मुलीला घडवणे’, ही साधना आहे’, असा भाव असणे : ‘ताईने तिची मुलगी कु. प्रार्थना (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १२ वर्षे) गर्भात असल्यापासून साधना म्हणून आध्यात्मिक स्तरावर ‘नामजपादी उपाय आणि ग्रंथवाचन करणे, भजने ऐकणे’, असे प्रयत्न केले. ‘मुलांना घडवणे’, ही साधना आहे’, हा दृष्टीकोन मला ताईकडून शिकायला मिळाला. प्रार्थनामध्ये (मुलीमध्ये) उपजतच अनेक दैवी गुण आहेत. मनीषाताईने तिच्यावर चांगले संस्कार केले आहेत. ताईची सेवांची व्यस्तता असते, तरीही ती प्रार्थनाला आवश्यकतेनुसार वेळ देते. ‘प्रार्थनाला घडवणे, तिला साहाय्य करणे, ही साधना आहे’, असा ताईंचा भाव असतो.
५ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणे : प्रत्येक सेवा करतांना ‘गुरुदेव ती सेवा करून घेणार आहेत’, अशी ताईची श्रद्धा असते. ताई सतत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समोर ठेवूनच सत्संग घेते. ‘ताई सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असते’, असे जाणवते.’
६. सौ. राधा सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे.
६ अ. साधकांना आधार देणे : ‘४ वर्षांपूर्वी माझे एक शस्त्रकर्म करायचे ठरले होते. त्या वेळी मी ताईला म्हणाले, ‘‘मला आता सेवा करता येणार नाही.’’ हे सांगतांना मला पुष्कळ रडू येत होते. तेव्हा ताईने आईच्या मायेने मला सांगितले, ‘‘तुम्ही या स्थितीतही सर्व करू शकता. तुम्हाला शस्त्रकर्माच्या दिवशी सेवा करता येणार नाही; पण तुम्ही दुसर्या दिवसापासून भ्रमणभाषवरून सेवा करू शकता.’’ गुरुदेवांच्या कृपेने आणि ताईच्या प्रेरणेने तिसर्या दिवशी मला रुग्णालयात बसून सेवा करता आली. माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर मी साधकांना घरी बोलावून सत्संग घेतले. माझी साधना आणि सेवा यांत खंड पडला नाही. ताईमुळेच मला या कठीण प्रसंगात आनंदी रहाता आले.
७. सौ. प्रीती कुलकर्णी, कोथरूड, पुणे.
७ अ. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तीव्र तळमळ असणे : ‘मनीषाताई पाठक व्यष्टी साधनेच्या आढाव्यात साधकांना ध्येय ठेवून प्रयत्न करायला सांगते, उदा. ‘दिवसभर संपूर्ण शरणागती अनुभवणे, १०० टक्के सकारात्मक रहाणे, इतरांचा विचार करणे, प्रेमभाव वाढवणे, प.पू. गुरुदेवांशी अखंड अनुसंधान ठेवणे, सतत कृतज्ञताभावात रहाणे’ इत्यादी. ती साधकांना ‘व्यष्टी साधनेचा आढावा हा आमच्यात आंतरिक पालट होण्यासाठी आहे आणि त्यातून आपल्याला गुरुचरणांशी जायचे आहे’, याची जाणीव करून देते.
७ आ. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : मध्यंतरी मनीषाताईच्या डोक्यातील ‘सोरायसिस’चा (टीप १) आजार वाढल्याने तिच्या डोक्यावरील पूर्ण केस काढावे लागले. ताई त्या परिस्थितीतही स्थिर होती. ‘स्वतःच्या जीवनात जे प्रसंग घडतात, ते ‘साधना चांगली व्हावी’, यासाठीच असतात’, असा ताईचा भाव असल्याने या प्रसंगात ताईने मनापासून आणि आनंदाने परिस्थितीचा स्वीकार केला.
टीप १ – ‘सोरायसिस’ हा तीव्र दाहक, दीर्घकाळ बरा न होणारा आणि संसर्गजन्य नसलेला त्वचा रोग आहे.’
८. वैद्या (सौ.) रीमा नान्नीकर, हडपसर, पुणे.
८ अ. सकारात्मक राहून शारीरिक मर्यादा सहजतेने स्वीकारणे : मनीषाताईला होणार्या शारीरिक त्रासांचा एक वैद्य म्हणून विचार केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘ताई एवढ्या तीव्र वेदना होत असतांनाही आणि सकारात्मक राहून स्वतःच्या शारीरिक मर्यादा सहजतेने स्वीकारते. एखाद्या व्यक्तीला होणार्या अनेक प्रकारच्या तीव्र वेदनांमुळे ती व्यक्ती कधीच निराशेत जाऊन मानसिक व्याधीने त्रस्त झाली असती; परंतु ताई हसतमुखाने वेदना सहन करून साधना आणि सेवा यांना प्राधान्य देते.’
९. श्री. केतन पाटील, सिंहगड रस्ता, पुणे
९ अ. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : ‘काही वर्षांपूर्वी आम्ही (मी आणि सौ. मनीषाताई) एका धर्मप्रेमींच्या घरी त्यांच्या पत्नीची गुणवैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी गेलो होतो. प्रत्यक्षात धर्मप्रेमींच्या पत्नीशी अनौपचारिक बोलतांना मला त्यांच्याविषयी मोजकीच १ – २ सूत्रे समजली. आम्ही त्यांच्या घरातून बाहेर पडल्यावर ताईने मला सांगितले, ‘‘त्या काकूंची आध्यात्मिक पातळी अधिक आहे.’’ नंतर काही दिवसांनी त्या काकूंची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. या प्रसंगातून ‘ताईची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिक आहे’, हे लक्षात आले.’
१०. सौ. स्नेहल केतन पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय २५ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.
१० अ. ‘गुरुलीला सत्संगा’च्या माध्यमातून साधकांना जोडून ठेवणे
१० अ १. प्रेमभाव : ‘कोरोना महामारीच्या कालावधीत प्रतिदिन ऑनलाईन ‘गुरुलीला सत्संग’ होत असे. त्या वेळी पुण्यात कोरोनाचे प्रमाण पुष्कळ वाढले होते. सर्व साधक घरीच होते. काही साधकांना कोरोना झाला होता. तेव्हा ‘ते साधक सर्व उपचार घेत आहेत ना ? नामजपादी उपाय करत आहेत ना ?’, याविषयी ताई विचारपूस करत असे.
एकदा सत्संग घेत असतांना तिला एका रुग्णाईत साधकाचा भ्रमणभाष आला. तेव्हा तिने लगेच अन्य साधकाला काही मिनिटे सत्संग घेण्यास सांगून तो भ्रमणभाष घेतला आणि ती त्या रुग्णाईत साधकाशी बोलली. एवढे प्रेम केवळ देवच करू शकतो ! ताई इतक्या प्रेमाने सूत्रे सांगायची की, ऐकतांना सर्व साधकांची भावजागृती होत असे. (या सूत्राचे टंकलेखन करतांना माझा भाव जागृत होत होता.)
१० अ २. साधकांचे कौतुक करणे आणि सर्वांमध्ये संघभाव निर्माण करणे : काही साधक ‘कोरोना झालेल्या साधकांना रुग्णालयात पोचवणे, त्यांना डबा देणे’, अशा सेवा करायचे. ताई अशा साधकांचे सत्संगात आवर्जून कौतुक करत असे. स्वतःच्या जिवाचा विचार न करता साधकांना साहाय्य करणारे साधक आणि त्यांना घडवणारी मनीषाताई ! साधकांमधील भाव आणि श्रद्धा ताईमुळे वाढत चालली आहे. ताई नेहमी सांगते, ‘‘आपल्या जिल्ह्यातील एकही साधक मागे रहायला नको. आपल्या सर्वांना गुरुचरणी जायचे आहे.’’ या गुरुलीला सत्संगाच्या माध्यमातून मनीषाताईने आम्हा सर्व साधकांना जोडून ठेवले आहे. सर्वांमध्ये संघभाव निर्माण केला आहे. जणू तिने सर्व साधकांना गुरुभक्तीच्या धाग्यात गुंफले आहे.’
११. श्री. सम्राट देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३८ वर्षे), कोथरूड, पुणे.
११ अ. आत्मविश्वास वाढवण्यासाठी साधकाला साहाय्य करणे : पूर्वी मला स्वभावदोष-निर्मूलन सत्संगात बोलायला भीती वाटायची. ‘सत्संगात नेमकेपणाने चूक कशी सांगायची ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. तेव्हा मनीषाताईने मला साहाय्य केले. ताईने मला ‘स्वतःकडून झालेल्या चुकीचे चिंतन अंतर्मुख होऊन कसे करायचे ?’, हे शिकवल्यामुळे मी सत्संगात आत्मविश्वासाने चूक सांगू शकलो.
११ आ. ताईचे प्रत्येक सेवा करतांना ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सद़्गुरु स्वाती खाडये यांना अपेक्षित अशी सेवा होत आहे ना ?’, याकडे लक्ष असते.’
१२. सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१२ अ. साधकांमध्ये सांघिकभाव निर्माण होण्यासाठी प्रयत्नरत असणे : ‘साधकांमध्ये सांघिकभाव निर्माण होण्यासाठी ‘साधकांशी एकत्रितपणे बोलणे, अनेक सेवा एकत्रितपणे करणे’, यांसाठी ती प्रयत्नरत असते. सेवा करत असतांना सगळ्या साधकांना सामावून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो.’
१३. श्री. रवींद्र धांडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५९ वर्षे), आैंध, पुणे.
१३ अ. चुकांविषयीची संवेदनशीलता : ‘एकदा मनीषाताईने एका समष्टी चुकीसाठी प्रायश्चित्त म्हणून प्रतिदिन एक चूक सर्वांना पाठवण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे ताई नियमित समष्टीतील एक चूक पाच सूत्रांंत (टीप २) पाठवत असे.
टीप २ – १. झालेली चूक, २. चूक होण्यामागील स्वभावदोष, ३. चुकीचा झालेला परिणाम, ४. ‘अशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी करावयाची उपाययोजना आणि ५. चुकीसाठी घेतलेले प्रायश्चित्त. साधक या ५ टप्प्यांत चूक लिहून देतात.’
ही सूत्रे पू. (सौ.) मनीषा पाठक संत होण्यापूर्वीची असल्याने लिखाणात त्यांचा उल्लेख ‘पू.’ असा केलेला नाही.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २१.८.२०२२)
|