तमिळनाडूत मंदिरांकडून चालवण्यात येणार्या शाळा सरकारच्या नियंत्रणाखाली आणणार !
सरकारच्या अन्य विभागाकडून चालवण्यात येणार्या शाळाही शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली येणार !
चेन्नई – तमिळनाडूचे अर्थमंत्री पलानीवेल त्यागराजन् यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्या वेळी त्यांनी अन्य संस्था आणि सरकारी विभाग यांच्याकडून चालवण्यात येणार्या शाळा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली आणणार असल्याचे म्हटले आहे. यांमध्ये राज्याच्या धर्मादाय विभागाच्या अंतर्गत नियंत्रित करण्यात आलेल्या मंदिरांकडून चालवण्यात येणार्या शाळांचाही समावेश आहे. आदि द्रविडर आणि आदिवासी कल्याण विभाग अन् अन्य विभाग यांच्याकडून चालवण्यात येणार्या शाळाही शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली येणार आहेत.
DMK govt to take over temple-run schools under School Education Department https://t.co/dbqlUnMMQn
— HinduPost (@hindupost) March 22, 2023
त्यागराजन् म्हणाले की, विविध विभागांच्या अंतर्गत चालवण्यात येणार्या शाळांची गुणवत्ता सुधारावी आणि सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. द्रमुक पक्षाच्या मित्रपक्षांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे मागास वर्गातील मुलांना दिला जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारेल, असे त्यागराजन् यांचे म्हणणे आहे.