हिंदुत्वाचे उच्चाटन करू पहाणार्यांचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक ! – मेगन ऑरिट्झ
हिंदु धर्म स्वीकारलेल्या मेगन ऑरिट्झ यांचे वक्तव्य
न्यूयॉर्क – अमेरिकेतील परिचारिका मेगन ऑरिट्झ यांनी हिंदु धर्म स्वीकारला आहे. ‘पोलिटिकली परफेक्ट’ या यू ट्युब चॅनलवर त्यांची मुलाखत प्रसारित झाली आहे. त्यात त्यांनी हिंदु धर्म स्वीकारण्यामागील त्यांची विचारप्रक्रिया आणि अनुभव सांगितले आहेत. अमेरिकेत ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (जागतिक स्तरावर हिंदुत्वाचे उच्चाटन) या विखारी कार्यक्रमाद्वारे हिंदुद्वेषी विचारवंत आणि बुद्धीवादी यांच्याकडून हिंदु धर्मावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु धर्माची महती सांगणारी ही मुलाखत सामाजिक संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या कार्यक्रमांद्वारे हिंदूंना गप्प करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्याचा वैचारिक प्रतिकार करणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
सौजन्य पोलिटिकली परफेक्ट
हिंदु धर्म आणि ख्रिस्ती धर्म यांच्यात मूलभूत भेद सांगतांना त्या म्हणाल्या की, ख्रिस्ती धर्मात प्रश्न विचारण्यास मनाई आहे; मात्र हिंदु धर्मात तसे नाही. भाविकांना आलेल्या शंका ते विचारू शकतात.
ॐ चा जप केल्यामुळे आयुष्यात सकारात्मक पालट !
ऑरिट्झ म्हणाल्या की, मी १९ वर्षांची असतांना माझ्या आईचे निधन झाले. त्या वेळी मी अमली पदार्थांच्या आहारी गेले होते. त्या वेळी माझ्या आजी आणि आजोबा यांनी माझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी व्हिएतनाम येथील शिवमंदिरात प्रार्थना केली होती. ते ख्रिस्ती असूनही त्यांनी हिंदूंच्या देवाकडे माझ्यासाठी प्रार्थना केली होती. या घटनेचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आणि मी हिंदु धर्माचा अभ्यास करू लागले. त्यानंतर मी देवाला प्रार्थना करू लागले. ‘मी हिंदु नसतांनाही भगवान शिवाने माझी काळजी घेतली आणि माझे रक्षण केले. त्यानंतर मी ‘ॐ’ चा जप करू लागले. त्यामुळे माझ्या आयुष्यात सकारात्मक पालट झाला.
संपादकीय भूमिकाकुठे हिंदु धर्माचा अभ्यास करून तो स्वीकारणारे अन्य पंथीय, तर कुठे धर्मशिक्षणाच्या अभावी आमिषांना बळी पडून हिंदु धर्म त्यागणारे नतद्रष्ट हिंदू ! |