‘पाणी प्यावे कि नको ?’ असा विचार करायला लावणारी अकोला बसस्थानकावरील पाणपोईची स्थिती !
एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमालिका !
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !
राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.
श्री. दत्तात्रय फोकमारे, यवतमाळ
अकोला, २३ मार्च (वार्ता.) – थर्माकॉलचे तुटलेले पेले, तंबाखूच्या पिचकार्या, साचलेला कचरा आणि अतिशय मळलेल्या टाईल्स, अशी अकोला बसस्थानकावरील पाणपोईची स्थिती पाणी पिण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ‘पाणी प्यावे कि नको ?’ असा विचार करायला लावणारी आहे. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतांना बसस्थानकांवर किमान स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही का होऊ शकली नाही ? असा प्रश्न एस्.टी. महामंडळाला पडायला हवा.
बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ कायम कचरा असल्याने तेथे भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. पिण्याच्या पाण्याच्या नळाखालीही कचरा आणि अस्वच्छता पहाता अनेक दिवस या पाणपोईची स्वच्छता करण्यात आली नसल्याचे दिसून येते. बसस्थानकाच्या परिसरात ‘श्री रामदेवबाबा जल सेवा समिती’च्या वतीने सेवाभावी वृत्तीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणीही अतिशय अस्वच्छता आहे. सतत पाणी ठिबकत असल्यामुळे येथे शेवाळे साचले असून घाणही झाली आहे.
शासन एस्.टी.कडे अन्य महामंडळांप्रमाणे लक्ष देत नाही ! – अरविंद पिसोडे, बसस्थानक प्रमुख, अकोलाअकोला महानगरपालिकेचे कर्मचारी एस्.टी. बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या रसवंतीचा (उसाच्या रसाचे दुकान) कचरा नेतात; मात्र बसस्थानकातील स्वच्छता कर्मचार्याने एकत्र केलेला कचरा नेत नाहीत. एक ट्रॅक्टरभरून कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिका ४ सहस्र रुपये पैसे आकारते. ते परवडत नाही. त्यामुळे खासगी व्यक्तीला एका ट्रॅक्टरमागे १ सहस्र रुपये भाडे देऊन बसस्थानक परिसरातील कचर्याची विल्हेवाट लावली जाते. शासन एस्.टी.कडे दुर्लक्ष करते. कामगार संघटना कामगारांच्या समस्या बैठकीच्या वेळी योग्य पद्धतीने मांडत नाहीत. त्यामुळे अनेक कामगारांच्या समस्या प्रलंबित आहेत. (राज्य परिवहन मंडळाने बसस्थानकांच्या समस्या समजून घ्यायला हव्यात आणि शासनाने राज्य परिवहन मंडळाच्या अडचणी समजून त्या सोडवणे आवश्यक आहे. – संपादक) |
बसस्थानके स्वच्छ राखण्यासाठी प्रवाशांनीही दायित्व उचलावे !
अकोला बसस्थानकाच्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकॉलचे पेले किंवा खाऊची वेष्टने टाकणारे, तंबाखूच्या पिचकार्यांनी टाईल्स खराब करणारे येथे येणारे प्रवासीच आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. एस्.टी.ची बसस्थानके स्वच्छ राखण्यासाठी प्रवाशांनीही त्यांचे दायित्व उचलायला हवे. राज्य परिवहन मंडळानेही प्रवाशांवर स्वच्छतेचा संस्कार करण्यासाठी आवश्यक सूचना लावणे, कचरा टाकण्यासाठी व्यवस्था करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा !आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्वीटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सअप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा. |